पोलिसांची कपडे पळवा मोहीम
बंगळुरू: जुन्या चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये नदीमध्ये स्नानासाठी गेलेल्या अभिनेत्रीचे कपडे माकड पळवते आणि मग ते हिरो परत मिळवून देतो वगैरेसारखे सीन तुम्ही पाहिले असतील. मात्र कर्नाटकमध्ये पोलिसांनीच पर्यटकांचे कपडे घेऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
लोकांनी पोलिसांनी घालून दिलेले नियम पाळावेत यासाठी कर्नाटक पोलिसांनी हटके उपाय केला आहे. पोलिसांच्या सूचनांचे पालन न करता पावसाळ्यामध्ये स्वत:चा जीव धोक्यात टाकून धबधब्यांखाली स्थानासाठी गेलेल्या पर्यटकांना पोलिसांनी धडा शिकवला आहे. पर्यटक धबधब्याखाली आंघोळ करत असतानाच अचानक तिथे पोलीस येतात. सामान्यपणे पोलीस पर्यटकांना धबधब्यातून बाहेर काढून समज देतात. मात्र इथे उलटे घडले आहे.
पोलीस आले आणि त्यांनी पर्यटकांना काहीही बोलण्याऐवजी नदीच्या काठावर असलेले त्यांचे कपडे घेतले आणि निघून जाऊ लागले. यामुळे पर्यटकही संभ्रमात पडले. हा सारा प्रकार मुद्दीगीरी येथील चरमाडी धबधब्याजवळ घडला आहे.
राज्य सरकारने पावसाळ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेत धबधब्यांखाली आंघोळ करण्यावर बंदी घातली आहे. राज्य सरकारने घातलेल्या बंदीचे आदेश झुगारून काही पर्यटक धबधब्याखाली स्थानासाठी गेले. अंतर्वस्त्रांवर असलेल्या या पर्यटकांना पोलीस कपडे घेऊन जाऊ लागले असता तसेच बाहेर पडून पोलिसांचा पाठलाग करावा लागला. हे पर्यटक कपडे घेऊन जाणाऱ्या चिकमंगळुरू पोलिसांकडे कपडे परत करण्याची विनंती करू लागले.
मात्र पोलीस त्यांच्या गाडीमध्ये हे कपडे ठेऊन निघून जाण्याच्या तयारीत असताना पर्यटकांनी माफी मागत कपडे परत करण्याची विनंती केली. सध्या हा व्हीडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी या पर्यटकांकडून त्यांची चूक कबूल करून घेतल्यानंतर पुन्हा कधीही असे करणार नाही असे वदवून घेतल्यानंतर कपडे परत केले. अनेकांनी पोलिसांच्या या अनोख्या भूमिकेचे कौतुक केले आहे. कर्नाटकच्या दक्षिणेकडील अनेक भागांमध्ये १४ आणि १५ जुलै रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.