कर्नाटकात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे?

राज्यसभा विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली नारेबाजी, एफआयआर दाखल, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिले सखोल तपासाचे आदेश

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Thu, 29 Feb 2024
  • 03:18 pm
'PakistanZindabad'slogansinKarnataka

कर्नाटकात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे?

#बंगळुरू

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सय्यद नसीर हुसेन यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा दिल्या असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील आरोप भाजप आणि पत्रकारांनी केला आहे. तसेच यासंबंधी भाजप नेत्यांनी एफआयआरही दाखल केला आहे. यासंदर्भातील एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान हुसेन यांनी हे दावे फेटाळून लावले असून त्यांचे कार्यकर्ते हुसेन यांच्यासाठी फक्त घोषणा देत होते, असा दावा त्यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी (२७ फेब्रुवारी) राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. तर संध्याकाळी मतमोजणीही झाली. यामध्ये काँग्रेसने कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुसैन यांच्या विजयाचा आनंद साजरा करतानाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्याचे समोर आले आहे. हा व्हीडीओ कितपत खरा आहे, हे अजून समजलेले नाही.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे राजकीय सचिव सय्यद नसीर हुसेन यांनी कर्नाटकमधून राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचा विजयाचा आनंद साजरा करताना कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. या नारेबाजीनंतर भाजप आमदार वाय.भारत शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकाराबाबतची एफआयआर दाखल केली आहे. काँग्रेसचे पाकिस्तानबद्दलचे वेड धोकादायक आहे. ते भारताला बाल्किस्तानकडे घेऊन जात आहे. ते आम्हाला परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अमित मालवीय यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि कर्नाटक भाजप नेते सी.टी रवी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय म्हणाले सय्यद नसीर हुसेन ?

भाजपचा दावा फेटाळून लावत काँग्रेस नेते नसीर हुसेन म्हणाले की, त्यांनी ‘नसीर हुसेन झिंदाबाद’, ‘काँग्रेस पार्टी झिंदाबाद,’ ‘नसीर खान झिंदाबाद’ आणि ‘नसीर साब जिंदाबाद’ अशा घोषणाच ऐकल्या. 

माध्यमांमध्ये जे काही दाखवले गेले ते मी ऐकले नाही. जर मी ते ऐकले असते, तर मी आक्षेप घेतला असता, विधानाचा निषेध केला असता आणि त्यांच्यावर आवश्यक कारवाईची मागणी केली असती. आम्ही घटनास्थळावरील मूळ व्हीडीओही मागवून घेतला आहे. ज्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकू येत नाहीत. त्यामुळे आता कोणता व्हीडीओ खरा आणि कोणता खोटा हे पोलीस तपासातूनच सिद्ध होईल, असे हुसेन म्हणाले आहेत.

...तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार

यासंदर्भात सविस्तर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा परिसरात अशी नारेबाजी करण्यात आली असेल तर ती बाब गंभीर आहे. दावा करण्यात आलेल्या व्हीडीओतील आवाजाची सत्यता तपासण्यात येणार आहे. न्यायवैद्यक विभागाच्या अहवालांनंतर यातील सत्य समोर येईल. विजयांनंतर आनंद व्यक्त करताना आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा दावा केवळ भाजप कार्यकर्त्यांनीच नव्हे तर काही प्रसारमाध्यमांनीही केला आहे. जर खरोखरीच कोणी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या असतील, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest