पाकिस्तान भाजपचा शत्रू, आमचा नाही
#बंगळुरू
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यापासून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमधील शाब्दिक चकमकींना जोर चढला होता. त्यात भाजपने आता काँग्रेसच्या पाकिस्तान प्रेमाचा मुद्दा लाऊन धरला आहे. नुकतेच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सय्यद नसीर हुसेन यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा दिल्या असल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असताना काँग्रेस आमदाराच्या विधानामुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
भाजपासाठी पाकिस्तान शत्रू देश असू शकतो, पण काँग्रेससाठी पाकिस्तान शत्रू नसल्याचे विधान कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी. के. हरिप्रसाद यांनी केले. यावर कर्नाटक भाजपाने काँग्रेसकडून देशविरोधी भावनांना खतपाणी घातले जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसने राज्यातील राज्यसभेची जागा जिंकल्यानंतर पाकिस्तान अनुकूल घोषणाबाजी करण्यात आली, असा आरोप भाजपाने केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना हरिप्रसाद यांनी वरील वक्तव्य केले आहे. काँग्रेस आमदार बी. के. हरिप्रसाद म्हणाले की, ते पाकिस्तानसोबत असलेल्या आमच्या संबंधांबद्दल बोलतात. त्यांच्यानुसार, पाकिस्तान एक शत्रू देश आहे, पण आमच्यासाठी पाकिस्तान शत्रू नाही. तो शेजारी देश आहे. ते म्हणतात पाकिस्तान भारताचा शत्रू आहे, अलीकडेच त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. ते लाहोरमधील जिन्नांच्या कबरीवर गेले होते. तिथे जाऊन आडवाणी म्हणाले होते की, जिन्नांसारखा धर्मनिरपेक्ष नेता नाही. त्यावेळी पाकिस्तान भारताचा शत्रू नव्हता का, असा सवालही हरिप्रसाद यांनी विधान परिषदेत उपस्थित केला आहे.
दरम्यान हरिप्रसाद यांच्या वक्तव्यावर कर्नाटक भाजपाने जोरदार टीका केली. पाकिस्तानने भारताविरुद्ध चार वेळा युद्ध पुकारले, पाकिस्तानचे दहशतवादी भारतात हिंसाचार घडवून आणतात, निरपराध नागरिकांची हत्या करतात तरीही पाकिस्तानला शत्रू राष्ट्र मानत नसल्याबद्दल भाजपाने टीका केली. काँग्रेस पक्ष देशविरोधी भावनांचे समर्थन करत असल्याचा भाजपाने आरोप केला. पाकिस्तानबद्दल काँग्रेसची काय भूमिका आहे, ते हरिप्रसाद यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते सयद नासेर हुसैन यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचे प्रकरण ताजे असताना आता हरिप्रसाद यांच्या वक्तव्याने राज्यातील वातावरण तापले आहे. या विरोधात भाजपा आमदारांनी विधान परिषदेतील मोकळ्या जागेत आंदोलन केले.