उत्तर प्रदेशातील हाथरस येथे धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी, ८५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका सत्संगा दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत ८५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये महिला तसेच लहान मुलांचा देखील समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हाथरस जिल्ह्यातील रतिभापूर या गावात एक सत्संग आयोजित केला होता. या सत्संगाला १५०० लोक उपस्थित होते. सत्संग सुरू असताना ही घटना घडली. साकार विश्व हरी भोले बाबा यांचा संत्सग या गावात आयोजित करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेनंतर समाजमाध्यमांतून प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, हाथरस मधील घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. झालेली जीवितहानी अत्यंत दुखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि मदत लवकरात लवकर पोचवण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस महासंचालकांना घटनास्थळी पोहचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक, आग्रा आणि अलीगडचे पोलिस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली टिम गठित करून दुर्घटनेच्या कारणांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. शाह म्हणाले, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या भीषण अपघातामुळे मन व्यथित झाले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावे अशी कामना करतो.