Otherwise we have to take action : ...अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 20 Jul 2023
  • 11:35 pm
...अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल

...अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल

मणिपूरातील व्हीडीओ प्रकरणी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले, सरकारला दिली कारवाईसाठी वेळ, संसदेसह देशभरात संताप

#नवी दिल्ली

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या केल्याच्या व्हीडीओविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू. कालचा व्हीडिओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. या प्रकाराबाबात आम्ही चिंता व्यक्त करतो. सरकारने पुढे येऊन निर्णय घेतले पाहिजेत, कठोर कारवाई केली पाहिजे.  अशा हिंसाचाराविरोधात गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती न्यायालयाला दिली पाहिजे. जातीय संघर्षात, हिंसाचाराचे साधन म्हणून महिलांचा वापर करून मानवी जीवनाचा भंग करणे घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहे. याप्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारने काय पावले उचलली याची माहिती द्या. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आम्ही थोडावेळ देऊ. अन्यथा आम्हालाच पावले उचलावी लागतील. हे प्रकरण आम्ही शुक्रवारी सुनावणीसाठी घेणार असल्याचेही चंद्रचूड म्हणाले आहेत.

आतापर्यंत एका आरोपीला अटक

दरम्यान या प्रकरणात मणिपूर पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातली ही पहिली अटक आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी आरोपीचे नाव हेरम हेरा दास असे असल्याचे सांगितले आहे.  तो थौबलचा रहिवासी आहे. येत्या काही तासांमध्ये आणखी काही आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.  जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात बलात्कार आणि हत्येची कलमे लावण्यात आली आहेत.

महिलांच्या अशा शेकडो घटना इथे घडल्यात- मुख्यमंत्र्यांची कबुली

मणिपूरमध्ये सध्या महिलांच्या व्हीडीओचा मुद्दा ऐरणीवर असून देशभरातील जनता त्याबाबत संताप व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर इथली कायदा-सुव्यवस्था अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याप्रकरणी राज्य सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की,  महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हीडीओ व्यथित करणारा आहे, पण अशा अनेक घटना इथे यापूर्वीही घडल्या आहेत. मणिपूरमध्ये सध्या दररोज हिंसाचार सुरु आहे. अनेक लोक यामध्ये मारले गेले आहेत, हजारो लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपण आमच्यावर आरोप करण्यापेक्षा ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे? हे पाहिले पाहिजे. राज्यात या घटनेप्रमाणे शेकडो केसेस झाल्या आहेत त्यामुळेच इथे इंटरनेट बंद करण्यात आले आहे.  या घटनेचा मी निषेध करतो. हे सर्वात हिणकस असे गुन्हेगारी कृत्य आहे. याप्रकरणी आम्ही एका व्यक्तीला पकडले असून त्याच्यासह जो पण या घटनेत सहभागी असेल त्याला मृत्यूदंडासारखी शिक्षा देण्यात येईल, असेही सिंह यांनी नमूद केले आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करावी-  चिदंबरम

मणिपूर प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे.  मोदीनी सर्वांत आधी बिरेन सिंग यांचे बदनाम सरकार बरखास्त केले पाहिजे. तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणी चिदंबरम यांनी केली आहे. माननीय पंतप्रधानांनी मणिपूरवर आपले मौन सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत होते, भारतातील इतर राज्यात विविध कार्यक्रम आणि उद्घाटनासाठी जात होते, तेव्हा त्यांनी मणिपूरच्या लोकांचा विचार केला नाही. त्यांना आता मणिपूरची आठवण का आली असेल? असा प्रश्न उपस्थित करत चिदंबरम यांनी, मणिपूरमधील महिलेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या प्रकरणांची दखल घेतल्याने मणिपूरची आठवण झाली असावी, असा टोला लगावला आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest