‘देशाला आता केवळ न्यायव्यवस्थाच वाचवेल’
#कोलकाता
देशातील सध्याचे वातावरण पाहता आता केवळ न्यायव्यवस्थाच देश वाचवू शकते, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. तसेच गुंड राजकारणी अतिक अहमदच्या हत्येवरूनही त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध जोरदार टीका केली. पोलीस, प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत अतिक अहमदची झालेली हत्या म्हणजे तेथे कायद्याचे राज्य नसल्याचा ढळढळीत पुरावा असल्याची टीका त्यांनी केली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी देश वाचवण्याऐवजी आमचं सरकार पाडण्याचा घाट घातला आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या विस्ताराचे काम करताना अमित शाह लोकशाही मार्गाने निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचा घाट घालत आहेत. हेच त्यांना करायचे असेल तर त्यांनी प्रथम गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आमच्या सरकारची मुदत संपण्यापूर्वीच ते तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याची धमकी देत आहेत. देशातील कायदा-सुव्यवस्थेचे संरक्षण करण्याऐवजी शाह माझं सरकार पाडण्यासाठी कट-कारस्थानं करत आहेत. जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा भाजप समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करते, असा आरोपही त्यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये होत असून त्या आम्ही एकत्रित लढवल्या तर भाजपचा नक्कीच पराभव होईल, असा विश्वासही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. भाजपतील चुकीच्या लोकांवर कारवाई होत नाही. मात्र, विरोधी नेत्यांवर काहीही कारण नसताना खोटे खटले तयार करून बदनाम केले जात आहे. त्यामुळे आता देशाला केवळ न्यायव्यवस्थाच वाचवू शकते.
गुंड राजकारणी अतिक अहमद याच्या पोलिसांसमोर झालेल्या हत्येबाबत ममता म्हणाल्या की, योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेशातील सरकार हे बनावट एन्काऊंटर स्पेशालिस्ट सरकार आहे. पोलीस चकमकी तेथे नित्याच्या झाल्या आहेत. या बनावट चकमकींविरुद्ध तेथील जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली पाहिजेत.
उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था स्थिती रसातळाला गेली आहे. पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत अतिक अहमदची झालेली हत्या म्हणजे तेथे कायद्याचे राज्य नसल्याचा ढळढळीत पुरावा होय. आपल्या घटनात्मक लोकशाहीत अशा घटनांना कोणतेही स्थान नाही. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध एखादा शस्रासारखा वापर करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार नसणाऱ्यांना तसेच मोदी सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला खटल्यात अडकवले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये कोठे काही झाले की केंद्र सरकार तातडीने केंद्रीय यंत्रणा राज्यामध्ये पाठवत आहे. राज्यांना त्यांचे काम करण्याची परवानगी नाकारत आहे. डबल इंजिनचा दावा करणाऱ्या भाजपचे डबल स्टॅण्डर्ड असून ते पक्षाप्रमाणे बदलत असते.
वृत्तसंस्था