विरोधकांच्या सततच्या गोंधळामुळे ओम बिर्ला यांची सभागृहाकडे पाठ
#नवी दिल्ली
मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरू असलेलेल गोंधळाचे वातावरण अजूनही कायम असून सलग दहाव्या दिवशी गोंधळ कायम होता. विरोधी खासदारांच्या सततच्या गोंधळामुळे लोकसभेचे सभापती कमालीचे नाराज असून त्यांनी सभागृहाकडे बुधवारी पाठ फिरवली. त्यामुळे आंध्र प्रदेशातील राजमपेटचे खासदार पीव्ही मिधुन रेड्डी यांनी लोकसभेतील कामकाज हाताळले. उपलब्ध माहितीनुसार जोपर्यंत विरोधकांचा गोंधळ थांबत नाही, तोपर्यंत सभापती ओम बिर्ला लोकसभेत येणार नाहीत. मणिपूरच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवदेन करावे या मागणीवर विरोध ठाम आहेत.
दुसऱ्या बाजूला राज्यसभेत विरोधी पक्षांनी मणिपूर हिंसाचारावर चर्चेसाठी ६० नोटिसा दिल्या असून त्या सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळल्या त्यामुळे संतप्त विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला. यानंतर इंडिया आघाडीचे सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी गेले. या भेटीनंतर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधानांनी मणिपूरला भेट द्यावी आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलावीत, अशी आमची भूमिका आहे. आम्हाला फक्त मणिपूर मुद्द्यावर चर्चा हवी आहे. ही चर्चा पंतप्रधान टाळत आहेत. आमच्या मागण्यांबाबत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.
दरम्यान, दिल्ली संदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशावर बुधवारी लोकसभेत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच विरोधकांचा गदारोळ सुरू झाल्याने सभागृहाचे कामकाज दुपारीपर्यंत तहकूब करण्यात आले. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने बुधवारी व्हीप जारी करून सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले. विधेयक मंजूर होण्याासठी भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
वृत्तसंंस्था