पंजाबमधील काँग्रेसचे जुने नेते मनीष तिवारी भाजपच्या संपर्कात?
मागच्याच आठवड्यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून भाजपशी घरोबा केला होता. त्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता आणखी एका मोठ्या नेत्याचं नाव पुढे येत आहे.
काही माध्यमांनी असा दावा केला आहे की, आनंदपूर साहिब येथील लोकसभा सदस्य मनीष तिवारी भाजपच्या संपर्कात आहेत. ते कधीही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात. यासंबंधी कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. मनीष तिवारी यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा खऱ्या ठरल्या तर ते कधीही हाती भगवा घेऊ शकतात. हा एक काँग्रेससाठी मोठा झटका ठरू शकतो. एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ हेसुद्धा भाजपमध्ये जातील, अशी शक्यता आहे. त्यातच आता तिवारी यांचं नाव पुढे येत आहे.
मनीष तिवारी यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचं नाव भाजपसोबत जोडणं चुकीचं आहे. तिवारी हे आपल्या मतदारसंघात लोकांची कामं करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या विषयी व्यक्त केल्या जात असलेल्या शक्यता चुकीच्या आणि निराधार आहेत.
अन्य एका माध्यमातील वृत्तानुसार एका भाजप नेत्याने सांगितलं की, कमलनाथ हे १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी आहेत. त्यांच्या विरोधात अनेक साक्षीदार आहेत. मी आठ दिवस उपोषण केल्यानंतर कमलनाथ यांच्या विरोधात एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली. रकाब गंज गुरुद्वारा जाळण्यामागची व्यक्ती तीच आहे, जी ९ वे गुरू श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या स्मरणार्थ बांधली गेली होती. कमलनाथ यांना भाजपमध्ये स्थान नाही, असे भाजप नेते बग्गा यांनी सांगितलं.