आता न्यायमूर्ती बनणार खासदार

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी दिला राजीनामा, भाजपच्या तिकिटावर तामलूकमधून लढवणार निवडणूक

PuneMirror

आता न्यायमूर्ती बनणार खासदार

#कोलकाता

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. भाजपने नुकतीच आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सत्ताधारी मोदी सरकारने अनेक जुन्या चेहऱ्यासंह अनेक नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच मागील काही दिवसांपासून कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत होते. यातच आता, न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा पत्र पाठवले असून त्याची एक प्रत देशाचे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टी.एस. शिवगनम यांना पाठवण्यात आली आहे. ते गुरुवारी म्हणजेच ७ मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर कोलकाता येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, ७ मार्च रोजी दुपारी एक कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतील.

न्यायमूर्ती गंगोपाध्याय मंगळवारी सकाळी उच्च न्यायालयात त्यांच्या चेंबरमध्ये पोहोचले, त्यानंतर त्यांच्या वतीने राजीनामा पत्र पाठवण्यात आले. न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी मागच्या आठवड्यातच जाहीर केले होते की, ते कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा देणार आहेत. न्यायमूर्ती गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याच्या सुनावणीशी संबंधित होते. ते यावर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये निवृत्त होणार होते. राजीनामा जाहीर करताना त्यांनी पश्चिम बंगालमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरू राज्यातील सत्ताधारी टीएमसीवरही हल्ला चढवला होता. दरम्यान, न्यायमूर्ती गंगोपाध्याय पश्चिम बंगालमधील तामलूक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ आहे. तामलूक ही जागा अलीकडच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २००९ पासून ही जागा टीएमसी सातत्याने जिंकत आहे.

दुसरीकडे, बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत येथून विजय मिळवला होता. अधिकारी तेव्हा टीएमसीचे नेते होते. टीएमसी सोडल्यानंतरही २०१६ च्या पोटनिवडणुकीत टीएमसीचा उमेदवार येथून विजयी झाला. २००९ ते २०१६ या काळात सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे उजवे हात असल्याचे बोलले जात होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest