आता चंद्र केवळ १७० किलोमीटरवर!

पृथ्वीवरून १४ जुलै रोजी निघालेलं भारताचे चांद्रयान-३ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले असून, त्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा ठप्पा ठरला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले हे चांद्रयान आता चंद्रापासून केवळ १७० किलोमीटर अंतरावर आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 10 Aug 2023
  • 12:03 pm
आता चंद्र केवळ १७० किलोमीटरवर!

आता चंद्र केवळ १७० किलोमीटरवर!

चांद्रयान-३ पोहोचले आणखी समीप, इस्रोसह देशवासियांची नजर १४ ऑगस्टवर

#श्रीहरिकोटा

पृथ्वीवरून १४ जुलै रोजी निघालेलं भारताचे चांद्रयान-३ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले असून, त्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा ठप्पा ठरला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले हे चांद्रयान आता चंद्रापासून केवळ १७० किलोमीटर अंतरावर आहे.

 इस्रोच्या अथक परिश्रमांनंतर चांद्रयान चंद्राच्या दिशेनं अवकाशात झेपावलं. याच चांद्रयानानं अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, ते चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. इस्रोकडून बुधवारी (दि. ९)  या संदर्भातील माहिती देण्यात आली. इस्रोच्या माहितीनुसार, ‘‘चांद्रयान-३ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. आता चांद्रयानाची कक्षा आणखी कमी करण्यात आली असून, हे अंतर १७४ किमी  x १,४३७ किमी इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.  म्हणजेच, यान अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे ज्यामध्ये त्याचे चंद्रापासून किमान अंतर १७४  किमी आणि कमाल अंतर १,४३७ किमी आहे.’’ आता इस्रोसह संपूर्ण जगाची नजर १४ ऑगस्टवर असणार आहे. कारण, या दिवशी पुन्हा एकदा यानाची कक्षा कमी करण्यात येणार आहे. परिणामी चंद्रापासूनचं त्याचं अंतर आणखी कमी होणार आहे.

 बुधवारी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी चांद्रयानाच्या कक्षा बदलण्यात आल्या. म्हणजेच चांद्रयानाचे थ्रस्टर्स सुरू करण्यात आले. येत्या १४ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेबारापासून १२.०४ पर्यंत चांद्रयानाची कक्षा बदलली जाईल. १६ ऑगस्टला सकाळी ८.३८ च्या दरम्यान पुन्हा एकदा पाचव्यांदा चंद्राची कक्षा बदलण्यात जाईल. म्हणजेच फक्त एका मिनिटासाठी चांद्रयानाचं इंजिन सुरू करण्यात येईल. १७ ऑगस्टला  चांद्रयानाचे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. याच दिवशी दोन्ही मॉड्यूल चंद्राच्या चारही बाजूंनी १०० किमी x १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत परिक्रमण करतील. १८ ऑगस्टला दुपारी पावणेचारपासून पुढील पंधरा मिनिटांसाठी लँडर मॉड्यूलची डिऑर्बिटिंग होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेची उंची कमी करण्यात येईल. २० ऑगस्टला चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलची डीऑर्बिटिंग होईल. २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करेल. सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणं घडल्यास लँडर चंद्राच्या पृष्ठावर असेल आणि भारताचं नाव थेट अवकाशात कोरलं जाईल. 

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest