संग्रहित छायाचित्र
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. भाजपने विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले असून या दोन्ही नेत्यांनी नितीशकुमार यांच्यानंतर शपथ घेतली आहे.
याआधी नितीशकुमार यांनी २०२२ मध्ये भाजपाशी असलेली युती तोडत राष्ट्रीय जनता दलाला (राजद) सोबत घेत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली होती. बिहारच्या विधानसभेतील एकूण २४३ आमदारांत राजदचे ७९ आमदार आहेत. बहुमताचा १२२ चा आकडा पार करण्यासाठी राजदला आणखी ४३ आमदारांची गरज आहे. बिहारमध्ये भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष आहे. भाजपाचे सध्या ७८ आमदार आहेत. संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे एकत्रित बलाबल म्हणजेच त्यांच्या आमदारांची संख्या १२३ होते. हा आकडा बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. भाजपाला हिंदुस्तानी अवाम मोर्चा या पक्षाचा पाठिंबा आहे. म्हणजेच या पक्षाचे चार आमदार हे नितीश कुमार आणि भाजपाच्या बाजूने असतील. म्हणजेच नितीश कुमार आणि भाजपा यांना एकत्र येऊन सरकार स्थापन करणे फार अडचणीचे ठरणार नाही, ही अटकळ असल्यानेच नितीश यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान सम्राट चौधरी (भाजप), विजय कुमार सिन्हा (भाजप), डॉ. प्रेम कुमार (भाजप), विजय कुमार चौधरी (संयुक्त जनता दल), बिजेंद्र प्रसाद यादव (संयुक्त जनता दल), श्रावण कुमार (संयुक्त जनता दल) आणि संतोष कुमार सुमन (हिंदुस्थान अवामी मोर्चा), सुमित कुमार सिंग (अपक्ष) यांनी रविवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी नितीश कुमार यांना पाठिंब्याचे पत्र याआधीच दिलेले आहे. नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याची शक्यता आहे, तर अगोदर राजदकडे असलेली मंत्रिपदे भाजपाला देण्यात येण्याची शक्यता आहे.