नवी संसद म्हणजे मोदींचा अहंकार जपणारा प्रकल्प
#नवी दिल्ली
संसदेची नवी वास्तू हा पैशांचा अपव्यय असून त्यातून जनतेला काहीही लाभ होणार नाही. हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यक्तिगत अहंकार जपणारा प्रकल्प असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. प्रत्येक हुकूमशहाला आपल्या मागे आठवण म्हणून एखादी वास्तू कायमस्वरूपी ठेवण्याची इच्छा असते. नव्या संसदेच्या वास्तूतून भविष्यात आपल्या आठवणी जागवल्या
जाव्यात हाच मोदींचा या मागचा हेतू असल्याची टीका त्यांनी केली.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनपेक्षितपणे नव्या संसदेच्या वास्तूला भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनी एक तासापेक्षा अधिक वेळ तेथे थांबून विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. संसदेच्या नव्या वास्तूत असणाऱ्या नव्या सुविधांचे स्वरूप त्यांनी जाणून घेतले. तसेच तेथे काम करत असलेल्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आणि नवी संसद उभारणीची घोषणा झाल्यापासून काँग्रेसने त्यावर सतत टीका केली आहे.
यापूर्वी काँग्रेस नेते सुरदीप सुरजेवाला ट्विटद्वारे म्हणाले होते की, देशातील सामान्य शेतकरी जेव्हा आपल्या हक्कांसाठी राजधानीच्या रस्त्यावर दीर्घकाळ लढा देत होते, त्यावेळी तुम्ही सेंट्रल विस्टाच्या नावाखाली आपल्यासाठी राजवाडा बांधत होता, ही बाब इतिहासात नमूद केली जाईल, हे सन्माननीय मोदीजी, आपण लक्षात ठेवा. लोकशाहीमध्ये मिळालेली सत्ता ही व्यक्तिगत आवडीसाठी वापरावयाची नसते. त्याचा वापर केवळ सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी करायचा असतो. संसदेची वास्तू ही काही दगड-विटांनी बनलेली नसते. ती बनते लोकशाही, राज्य घटनेची मूल्ये आत्मसात करण्यातून. लोकशाहीत सामाजिक-आर्थिक-राजकीय समानता हवी, देशातील १३० कोटी जनतेच्या इच्छा-आकांक्षाचे प्रतीक हवे. या सर्व मूल्यांचा नाश करून त्यावर बांधलेल्या इमारतीचा उपयोग काय? वृत्तसंस्था