‘मुस्लिम महिलांची खासदारांनी रक्षाबंधनादिवशी भेट घ्यावी’
#नवी दिल्ली
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी रक्षाबंधनादिवशी मुस्लिम महिलांची भेट घ्यावी अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाने हे पाऊल उचलले असून घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्याबरोबर मुस्लिमांच्या मतासाठी त्यांच्या घराला रक्षाबंधनाच्या दिवशी भेट देण्यास सूचवले आहे. खासदारांनी रक्षाबंधनाच्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करावे आणि मुस्लिम महिला मतदारांशी संपर्क साधावा असे पंतप्रधानांनी सूचवले आहे. तिहेरी तलाकवर केंद्राने घातलेल्या बंदीमुळे महिलांना दिलासा मिळाला असून त्याचे मतांमध्ये रुपांतर करण्याची योजना आहे.
पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील एनडीएच्या खासदारांची पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच एक बैठक घेतली. बैठकीला उपस्थित काही खासदारांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधण्याचा आग्रह धरला. बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, तिहेरी तलाक बंदीमुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीत मोदींनी तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या निर्णयावरही चर्चा केली. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तिहेरी तलाकवर बंदी घालण्यासाठी संसदेने २०१९ मध्ये एक विधेयक मंजूर केले होते. यानंतर तिहेरी तलाक देणे हा गुन्हा ठरला असून त्यासाठी पतीला तुरुंगवासही होऊ शकतो.
एका ‘मन की बात’ कार्यक्रमातही पंतप्रधान मोदींनी मुस्लिम महिलांबद्दल विशेष चर्चा केली होती. ते म्हणाले होते की, सरकारच्या हज धोरणात बदल झाल्यानंतर हजला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी ४ हजार मुस्लिम महिलांनी महरम (पती किंवा पुरुष नातेवाईक) शिवाय हज यात्रा केली आहे. सोमवारी, पंतप्रधान मोदींनी पश्चिम उत्तर प्रदेश, कानपूर आणि बुंदेलखंड प्रदेशातील एनडीएच्या ४५ खासदारांसोबत बैठकही घेतली. बैठकीत पंतप्रधान आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली.
मोदी म्हणाले की विरोधकांनी चारित्र्य नव्हे तर कपडे बदलले आहेत. त्यांचे चरित्र तेच आहे. कपडे बदलून चारित्र्य बदलत नाही. यूपीएच्या डोक्यावर अनेक डाग आहेत, म्हणूनच त्यांना आघाडीचे नाव बदलावे लागले. एनडीए हा स्वार्थासाठी नाही तर त्यागासाठी बनला आहे. बिहारमध्ये आमचे जास्त आमदार होते, तरीही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पंजाबमधील अकाली सरकारमध्ये आमचे आमदार मोठ्या संख्येने होते. आम्ही तेथे उपमुख्यमंत्री पदही मागितले नाही. खासदारांनी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवल्या पाहिजेत. सरकारने कोणती कामे केली ते प्रत्यक्ष जनतेला सांगा. खासदारांनी त्यांच्या भागातील स्थानिक प्रश्नांवर भर देऊन संवाद वाढवला पाहिजे. २०२४ च्या निवडणुकीनंतरही आमचे सरकार स्थापन होईल.
येत्या दहा दिवसांत एनडीएच्या सर्व खासदारांना भेटण्याची मोदींची योजना आहे. भाजपने एनडीएच्या खासदारांची ११ भागांमध्ये विभागणी केली आहे. केंद्रीय मंत्री संजीव बालयन, बीएल वर्मा, धर्मेंद्र प्रधान आणि शंतनू ठाकूर हे मोदी आणि खासदारांमधील बैठकीची तयारी करत आहेत. मोदी तिसऱ्या आणि चौथ्या भागातील खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. त्यात उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीपमधील एकूण ९६ खासदारांचा समावेश असेल. बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लडाख येथील ६३ खासदार ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. ८ ऑगस्ट रोजी पीएम मोदी राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यातील ७६ खासदारांची भेट घेणार आहेत. ९ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथील ८१ खासदारांशी चर्चा होणार आहे. याशिवाय, भाजप ईशान्येकडील ३१ खासदारांसोबतच्या पंतप्रधानांच्या भेटीची तारीख लवकरच निश्चित करणार आहे.वृत्तसंंस्था