कुनोतील आणखी एक चित्ता दगावला; एकूण ९ जणांचा मृत्यू
#भोपाळ
मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमधील आणखी एक चित्ता (मादी) मरण पावली आहे. हा चित्ता धात्री नावाने ओळखला जात होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक असीम श्रीवास्तव याबाबत म्हणाले की, धात्री सकाळी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.
२६ मार्चपासून आतापर्यंत कुनोतील ९ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कुनो येथे जन्मलेल्या तीन पिल्लांचाही समावेश आहे. तत्पूर्वी, कुनो व्यवस्थापनाने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 'कुनो राष्ट्रीय उद्यानातील १४ चित्ते (७ नर,६ मादी आणि १ पिल्लू) निरोगी आहेत. कुनो आणि नामिबियातील वन्यजीव तज्ज्ञ सतत त्यांची आरोग्य तपासणी करत आहेत. याशिवाय खुल्या जंगलात फिरणाऱ्या दोन मादी चित्त्यांवर नजर ठेवण्यात आली असून त्यांना बंदिवासात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन मादी चित्तांपैकी एक चित्ता आज सकाळी मृतावस्थेत आढळून आली.
हा चित्ता कुनो नॅशनल पार्कच्या मोकळ्या जंगलातून फिरत होता. तिला आरोग्य तपासणीसाठी पार्कमध्ये आणले जाणार होते. त्यासाठी गेल्या १० दिवसांपासून वनविभागाचे पथक तिचा शोध घेत होते. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने कुनो येथील चित्त्यांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली होती. २० जुलै रोजी न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले होते की, राजकारण सोडून कुनो येथील काही चित्त्यांना राजस्थानमध्ये हलवण्याचा विचार करावा. तुम्हाला राजस्थानमध्ये यापेक्षा चांगली जागा का नाही सापडत? केवळ राजस्थानमध्ये विरोधी पक्षाचे (काँग्रेस) सरकार आहे, याचा अर्थ तुम्ही या प्रस्तावावर विचार करू नये,असा होत नाही. आफ्रिका आणि नामिबियातून आणलेल्या ४० टक्के चित्तांचा मृत्यू झाला आहे. त्यांना भारतात आणून एक वर्ष उलटले नाही. मृत्यूची ही आकडेवारी चांगली नाही.वृत्तसंंस्था