‘मोदी हटाव, देश बचाव’ पोस्टर गुजरातमध्येही
#नवी दिल्ली
गुजरातची राजधानी अहमदाबादच्या विविध भागात मोदी हटाव, देश बचाव पोस्टर लागल्याने पोलिसांनी कारवाई करत आठजणांना अटक केली आहे. या पूर्वी देशाची राजधानी नवी दिल्ली आणि देशाच्या अन्य काही भागात अशीच पोस्टर लागली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये अशी पोस्टर लागण्याची कोणी अपेक्षा केलेली नव्हती.
आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशव्यापी पोस्टर लावण्याची मोहीम चालू करण्याची घोषणा नुकतीच केली होती. आम आदमी पक्षाने ही मोहीम अकरा भाषांमध्ये देशभर सुरू केली आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलुगू, बंगाली, ओरिया, कन्नडा, मल्याळी आणि मराठी भाषेत ही पोस्टर छापलेली आहेत. गेल्या आठवड्यात दिल्लीत ही पोस्टर हजारोंच्या संख्येने झळकली तेव्हा पोलिसांनी त्याविरुद्ध व्यापक मोहीम हाती घेतली. त्यानुसार त्यांनी ४९ जणांवर एफआयआर दाखल केले आणि सहाजणांना अटक केली होती. त्यातील दोनजण मुद्रणालयाचे मालक होते.
सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि छापणाऱ्याचे नाव पोस्टरवर नसल्याने ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या विविध भागात कोणत्याही परवानगीविना अशी आक्षेपार्ह पोस्टर लावली होती. गुजरात आम आदमी पार्टीचे अध्यक्ष इसुदान गढवी म्हणाले की, ज्यांना अटक झाली आहे ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पक्षाने लावलेल्या पोस्टरमुळे भाजप घाबरला असून त्यांनी आपली अहंकारी आणि हुकूमशाही वृत्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे. विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तुम्ही आमच्यावर कितीही दबाव आणला तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही आमचा
लढा कायम ठेवू. वृत्तसंस्था