तिसऱ्यांदाही मोदीच, पण...
लोकसभा निवडणुकीचे निकाल (Lok Sabha Election Results)जवळपास स्पष्ट झाले आहेत. ५४२ जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९१ जागा मिळण्याच्या मार्गावर आहे. अखेरचे वृत्त हाती आले तोपर्यंत, इंडिया आघाडीनेही जोरदार कामगिरी करताना २३४ जागांवर विजयी अथवा आघाडी अशी कामगिरी केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी अद्याप भाजपला बहुमताचा २७२ चा आकडा पार करता आलेला नाही. एनडीएला बहुमत मिळाल्याने तेच सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. मात्र, एनडीएतील घटक पक्षांना आपल्या बाजूने ओढून इंडिया आघाडीदेखील सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील आहे.
सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. एनडीएने बुधवारी (दि. ५) सकाळी साडेअकरा वाजता आपल्या घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांना भेटीसाठी बोलावले आहे. दुसरीकडे, बुधवारी संध्याकाळी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठकही बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, रात्री १० वाजेपर्यंत भाजपला २४०, काँग्रेसला ९९, सपाला ३७, टीएमसीला २९, द्रमुकला २२ टीडीपीला १६, जेडीयूला १२, शिवसेना यूटीबीला ९, राष्ट्रवादी काँग्रेसला ७, आरजेडीला ४, लोक जनशक्ती पक्ष रामविलास ५ आणि शिवसेना शिंदे ७ जागावंर विजयी अथवा आघाडीवर आहे.
देशाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘‘देशाला मोदी-शहा नको आहेत. मतदारांनी हाच कौल निवडणुकीतून दिला आहे.’’ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपच्या घसरत्या पाठिंब्यासाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले. हा मोदींचा नैतिक पराभव असल्याचे ते म्हणाले. हा मोदींचा पराभव असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बॅनर्जी यांनी केली.
निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत एकूण ७ टप्प्यात मतदान झाले. ४४ दिवसांची ही निवडणूक १९५२ नंतरची सर्वात मोठी निवडणूक होती. १९५२ मध्येनिवडणूक चार महिने चालली. या दोन प्रसंगांव्यतिरिक्त निवडणूक प्रक्रिया साधारणपणे ३० ते ४० दिवसांत पूर्ण होते.
हा १४० कोटी भारतीयांचा विजय
हा १४० कोटी भारतीयांचा विजय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. "मी देशाच्या निवडणूक आयोगाचेही अभिनंदन करेन. निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठी निवडणूक इतक्या सक्षमपणे पार पाडली. जवळपास १०० कोटी मतदार, एक कोटी मतदान कर्मचारी, ११ लाख बूथ कर्मचाऱ्यांनी एवढ्या कडक उन्हात आपली जबाबदारी चोख पार पाडली. आमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले," असे ते म्हणाले.