संग्रहित छायाचित्र
माॅस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे रशिया आणि भारत यांच्यातील बळकट संबंधांची आम्हाला खात्री आहे. त्यांना धमकावले जाऊ शकत नाही किंवा राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, अशी स्तुतीसुमने त्यांनी उधळली.
पुतीन म्हणाले ‘‘राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करताना पंतप्रधान मोदींच्या कठोर भूमिकेचे कौतुक केले जाते. मी कल्पना करू शकत नाही की मोदींना धमकावले जाऊ शकते किंवा काहीही करण्यास भाग पाडले जाऊ शकते, कोणतीही कारवाई किंवा कोणताही निर्णय जो भारत आणि भारतीय लोकांच्या विरोधात असेल.’’
रशियन मीडिया स्पुतनिकनुसार, पुतीन मॉस्कोमध्ये आयोजित १४ व्या व्हीटीबी इन्व्हेस्टमेंट फोरम 'रशिया कॉलिंग'मध्ये बोलत होते. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सतत विकसित होत आहेत आणि याची हमी पंतप्रधान मोदींचे धोरण आहे. खरे सांगायचे तर, भारतीय जनतेने त्यांच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे मला कधीकधी आश्चर्य वाटते, असेही त्यांनी नमूद केले.
यापूर्वी पुतीन यांनी भारत-रशिया संबंधांवरून पाश्चात्य देशांना इशारा दिला होता. पाश्चात्य देशांनी भारत आणि रशियामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. असे करणे निरर्थक आहे, कारण भारत हा एक स्वतंत्र देश आहे आणि तो तेथील नागरिकांच्या हितासाठी काम करतो. पाश्चात्य देश प्रत्येक देशासाठी शत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जो त्यांच्या मक्तेदारीशी सहमत नाही, परंतु भारत सरकार आपल्या देशाच्या हितासाठी स्वतंत्रपणे काम करत आहे, असे सांगत पुतीन यांनी पाश्चात्य देशांना खडसावले होते.
‘मेक इन इंडिया’चे कौतुक
२९ जून रोजी पुतीन यांनी ‘मेक इन इंडिया’चे कौतुक केले. ते म्हणाले होते, ‘‘भारत असा देश आहे जो कंपन्यांना आपल्या देशात येऊन काम करण्यास प्रोत्साहित करतो. आमचे खास मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षांपूर्वी मेक इन इंडिया सुरू केली होती. आज भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.’’ रशियामध्ये देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भारताचे उदाहरण दिले. ‘‘ज्या वेळी पाश्चिमात्य देश भारताप्रमाणेच रशियासोबतच्या व्यापारावर सातत्याने निर्बंध लादत आहेत, तेव्हा आपण आपल्या देशातील कंपन्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे,’’ असे पुतीन म्हणाले होते.
यापूर्वीही केले आहे अनेकदा कौतुक
२८ रोजी पुतीन यांनी मोदींना खरे देशभक्त म्हटले होते. मॉस्कोमधील वालदाई डिस्कशन क्लबच्या १९ व्या वार्षिक बैठकीत ते म्हणाले होते की, मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने विकासात अभूतपूर्व यश मिळवले आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांची मेक इन इंडियाची कल्पना अर्थव्यवस्था आणि मूल्यांच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. भविष्य भारताचे आहे, कारण ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. मोदी हे आईस ब्रेकरसारखे आहेत. आपल्या लोकांच्या हिताचे रक्षण कसे करायचे हे त्याला चांगलेच माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा लोकांपैकी एक आहेत जे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवण्यात तज्ञ आहेत.
पुतीन यांनी यापूर्वीही मोदींचे कौतुक केले आहे. यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी आर्थिक सुरक्षेवरील ऑलिम्पियाडला संबोधित करताना पुतिन यांनी मोदींचे एक बुद्धिमान व्यक्ती म्हणून वर्णन केले होते. ते म्हणाले होते, ‘‘मोदी हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांच्याशी आमचे चांगले राजकीय संबंध आहेत. भारत आणि रशिया हे शतकानुशतके मित्र आणि भागीदार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत झपाट्याने विकसित होत आहे. हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे.’’
त्यापूर्वी १३ सप्टेंबर रोजी पुतीन यांनी मोदींचे कौतुक केले होते. ‘‘पूर्वी आमच्या देशात कार बनत नव्हत्या, पण आता बनतात. हे खरे आहे की त्या ऑडी आणि मर्सिडीजपेक्षा कमी चांगले दिसतात, परंतु ही समस्या नाही. आपण रशियन बनावटीची वाहने वापरली पाहिजेत. आपण आपला मित्र देश भारताचे अनुसरण केले पाहिजे. ते देशातच वाहने बनवत आहेत आणि वापरत आहेत. कोणत्या वर्गातील अधिकारी कोणत्या गाड्या चालवू शकतात हे आपण ठरवले पाहिजे, जेणेकरून ते देशांतर्गत गाड्या वापरतील,’’ असे ते म्हणाले होते.