मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून आमदार झिशान सिद्दीकींना हटवले
मुंबई
काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. त्यामुळे सावध झालेल्या काँग्रेसने बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीवर कारवाई करत त्यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन आमदार झिशान सिद्दीकीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेने काँग्रेसने हे पाऊल टाकले आहे. झिशानच्या जागी आता अखिलेश यादव यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा आमदार होते. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार आणि औषध-अन्न नियंत्रण खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. यापूर्वी दोन वेळा सलग टर्म (१९९२-१९९७)नगरसेवक म्हणूनही काम केले होते. बाबा सिद्दीकीचा मुलगा झिशान सिद्दिकी सध्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून काँग्रेसचे आमदार आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मुलगा झिशानला मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हटवल्याने आता तोदेखील वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता झिशानदेखील काय निर्णय घेतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. झिशान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते.