‘आप’ च्या कामगिरीवर मान यांनी चर्चा करावी
#चंडीगढ
सत्तेवर येण्यापूर्वी राज्यातील जनतेला दिलेल्या आश्वासनावर आपने काय कामगिरी केली त्यावर जाहीर चर्चा करावी, असे खुले आव्हान पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना शनिवारी दिले. राज्यातील जनतेने आप पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले. सत्तेवर येऊन एक वर्ष झाले. या काळात कोणत्या आश्वासनांची राज्य सरकारने पूर्तता केली हे जनतेला जाणून घ्यावयाचे असल्याचे सिद्धू यांनी सांगितले.
आप सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, पंजाबमध्ये बदल घडवून आणण्याचे खोटे स्वप्न दाखवत आप पक्ष सत्तेवर आला. त्यावेळी दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची अंमलबजावणी पक्षाला करता आलेली नाही. त्यामुळे ती आश्वासने चुनावी जुमला होता, हे आता सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील दारू माफिया असो की वाळू माफिया असो, त्यांच्याच इशाऱ्यावर आजही सरकार चालत आहे. राज्यात कोणताही बदल झालेला नसल्याचे दिसत आहे.
पतियाळा तुरुंगातून सुटका झालेले पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी जालंधरमधील काँग्रेसचे दिवंगत खासदार चौधरी संतोकसिंग यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या वेळी त्यांच्या समवते फिलौरचे आमदार विक्रमजीतसिंग चौधरी उपस्थित होते. जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने चौधरी संतोकसिंग यांच्या पत्नी करमजीत चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले चौधरी संतोकसिंग यांचे यात्रेच्या काळात १४ जानेवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेले चौधरी यांचे निधनही पक्षाच्या कामात सहभागी असताना झाले. काँग्रेसशी असलेला त्यांच्या कुटुंबाचा संबंध शंभर वर्षांहून अधिक जुना आहे. अशा प्रकारची घराणी ही काँग्रेसचा खरा आधार आणि मजबूत पाया आहे. त्यामुळे अशा नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून अशा काळात त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे.