ममतादीदींनाही आठवला राम!
#कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यावेळी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला. मात्र आता राम मंदिराच्या निर्मितीचा मुद्दा प्रभावी ठरत असल्याने तृणमूल काँग्रेसनेही रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा, काली पूजा आणि सरस्वती पूजेला जास्त महत्त्व आहे. पण, काही दिवसांपासून रामनवमी आणि हनुमान जयंती लोक साजरे करत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांची संख्या वाढली आहे. या वर्षी १७ एप्रिलला रामनवमी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने विविध महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रामनवमीच्या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपासून सातत्याने हिंसक घडना घडल्याचे समोर आले आहे. मागील वर्षीदेखील हिंसा झाली होती. या मुद्द्यांवर भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. ममता या तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यात, या वर्षी ममता यांनी रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करून महत्त्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवत घेतला निर्णय
भाजपने ममता बॅनर्जी यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांना 'जय श्री राम' ऐकूनच राग येतो. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आपली हिंदू विरोधी प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण, आता खूप उशीर झाला आहे. तरी, रावनवमीच्या यात्रेवर दगडफेक होणार नाही याची काळजी घेतली जावी. दगडफेक होणार नाही याची काळजी घेतली जाईल का? जय श्री राम, असं आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले आहेत. देशामध्ये काही महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. अनेक सर्व्हेमध्ये भाजपला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन करून पंतप्रधान मोदी यांनी उत्तरेतील राज्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याला उत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे.