‘पश्चिम बंगालमध्ये ममतांची हिटलरशाही’
#कोलकाता
आगामी लोकसभा निवडणुकीस वर्षापेक्षा अधिक कालावधी असला तरी पश्चिम बंगाल भेटीवर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ शुक्रवारी फोडला. पश्चिम बंगालमध्ये यश मिळवणे भाजपच्या दृष्टीने आवश्यक असल्याने बिरभूम जिल्ह्यातील सियुरीत झालेल्या जाहीर सभेत शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली.
रामनवमी उत्सवावेळी झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करून शाह म्हणाले की, सध्या राज्यात ममता बॅनर्जी यांची हिटलरसारखी हुकूमशाही सुरू आहे. पश्चिम बंगालमधून भाजपला लोकसभेच्या ३५ जागांवर विजय मिळवून द्या आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यास मदत करा. ममता बॅनर्जी यांचा बेकायदेशीर कारभार मोडीत काढण्यासाठी भाजपला साथ द्या.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला १८ जागा मिळाल्या होत्या. त्या अगोदर २०१४ मध्ये त्यांना केवळ एकच जागा मिळाली होती. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ७७ जागा मिळवत दमदार कामगिरी केली होती.
आपल्या १८ मिनिटांच्या भाषणात शाह म्हणाले की, पश्चिम बंगालच्या नागरिकांना रामनवमी शांततेने साजरी करण्याचा अधिकार आहे की नाही. हावडा आणि हुगळी येथे मिरवणुकांवर जाणीवपूर्वक हल्ले केले गेले. याला तृणमूल काँग्रेसची तुष्टीकरणाची भूमिका जबाबदार असून आता राज्यातील नागरिकच विचारत आहेत की अशीच स्थिती राहिली तर अयोध्येत राम मंदिराची निर्मिती करून फायदा काय?
वृत्तसंस्था