संग्रहित छायाचित्र
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं गुरुवारी (12 सप्टेंबर) निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांना अॅक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास होता. 19 ऑगस्टला त्यांना ताप आला. त्यानंतर येचुरी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी न्यूमोनियाच्या कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती.
सीताराम येचुरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (Communist Party of India (Marxist)) चे महासचिव होते. 1992 पासून ते पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य होते. 2005 ते 2017 या काळात ते पश्चिम बंगाल मधून राज्यसभेवर गेले होते. 1974 मध्ये येचुरी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया मध्ये दाखल झाले. त्यानंतर एका वर्षातच त्यांना कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चं सदस्यत्व मिळालं.
सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी मद्रास मध्ये एका तेलुगू भाषिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील इंजीनियर होते. त्यांची आई देखील सरकारी अधिकारी होती. हैदराबादमध्ये त्यांचं बालपण गेलं. हैदराबाद येथील ऑल सेंट्स हायस्कूल मध्ये त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. पुढे दिल्ली येथील प्रेसिडेंट इस्टेट स्कूल मध्ये त्यांचं पुढील शिक्षण झालं. दिल्लीमधल्याचं सेंट स्टीफन कॉलेज मधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात बीए (ऑनर्स) केलं. तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एमए केलं. आणीबाणीच्या काळात ते जेएनयूमध्ये विद्यार्थी असताना त्यांना अटक झाली होती.