'लिव्हिंग लिजेंड'फली नरिमन कालवश
#नवी दिल्ली
प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील फली एस. नरिमन यांचे बुधवारी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. इंदिरा गांधी सरकारच्या काळात ते देशाचे अतिरिक्त स़ॉलिसिटर होते. विधी क्षेत्रातील प्रदीर्घ काम आणि कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्वतंत्र बाण्यामुळे ते 'लिव्हिंग लीजेंड' म्हणून ओळखले जात.
१० जानेवारी १९२९ रोजी रंगून येथे जन्मलेल्या फली नरिमन यांचे शालेय शिक्षण विविध ठिकाणी झाले. सुवर्णपदकासह त्यांनी विधि शाखेची पदवी मिळवली. मग मुंबई उच्च न्यायालयात १९५० पासून त्यांनी वकिली सुरू केली. वीस वर्षे वकिली केल्यानंतर १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ बनले.
त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता लक्षात घेऊन १९७२ मध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी त्यांची नियुक्ती केली. १९७५ पर्यंत ते या पदावर होते. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करताच त्याचा निषेध म्हणून त्यांनी लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला व खासगी वकिली सुरू केली. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर नरिमन हे युनियन कार्बाइड कंपनीचे वकील होते. मात्र पीडितांची भयानक अवस्था पाहिल्यानंतर ‘आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक’ अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिलीच, पण या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड घडवून आणताना पीडितांना ४७ कोटी डॉलरची भरपाई मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नरीमन यांनी लढलेल्या हाय-प्रोफाइल केसेसमध्ये कुप्रसिद्ध भोपाळ गॅस शोकांतिका, गोलक नाथ, एसपी गुप्ता आणि टीएमए पै फाउंडेशन यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. आपल्या वकिलीबरोबर फली सॅम नरिमन यांनी, 'गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट', 'द स्टेट ऑफ द नेशन', 'बिफोर मेमरी फेड्स: ऑटोबायोग्राफी' , भारताची कायदेशीर व्यवस्था यांसारखी पुस्तकेही लिहिली आहेत. ते पहिले व्यक्ती होते, ज्यांनी 'हॉर्स ट्रेडिंग' हा शब्दप्रयोग वापरणे म्हणजे घोड्यांचा अपमान आहे, असे म्हटले होते.