संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेते, दिग्गज, खेळाडू, अध्यात्माशी संबंधित अनेकांना कार्यक्रमाला निमंत्रण दिले आहे. विरोधी नेत्यांनाही निमंत्रणे पाठवली आहेत. काँग्रेस नेत्यांनी हे निमंत्रण नाकारले असून अनेक विरोधी नेत्यांनी कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंदिराचे काम अर्धवट असताना राजकीय लाभासाठी कार्यक्रम होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. भाजपने काँग्रेसला राम विरोधी पक्ष म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. (Ayodhya)
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांना वैयक्तिक निमंत्रण पाठवले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम भाजप, संघाचा आहे. मंदिराचे काम अर्धवट असताना त्याचे उद्घाटन होत असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. काँग्रेस नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावर 'इंडिया' आघाडीच्या अनेकांनी कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
विहिंपने राजदचे लालू प्रसाद यादव यांच्याकडे वेळ मागितला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही निमंत्रण नाकारण्याचे संकेत दिले आहेत. त्यांना हे निमंत्रण विहिंपचे आलोक कुमार यांनी पाठवल्याचे कळते. याबाबत अखिलेश म्हणाले की, मी या आलोक कुमार यांना ओळखत नाही, मी त्यांना कधी भेटलो नाही. आपण ओळखीच्या लोकांचे निमंत्रण स्वीकारतो. सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही निमंत्रण नाकारले असून धार्मिक कार्यक्रमाचे राजकीयीकरण होत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच याशिवाय काँग्रेसचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. जेडीयूचे अध्यक्ष, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निमंत्रण दिले आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी यांनी पक्षाने अद्याप याबाबत निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. मात्र, पवारांनी नुकतेच सांगितले होते की, राम मंदिरात जेव्हा इच्छा असेल तेव्हा जाईन. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, उद्घाटनासाठी त्यांना आमंत्रित केले जाणार नाही. धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करण्यास आपला ठाम विरोध आहे.
कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी अडवाणींच्या उपस्थितीबद्दल माहिती दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.