संग्रहित छायाचित्र
जयपूर: जेईई अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षेला (JEE) दोन दिवसांचा अवधी जाताना राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. जानेवारी महिन्यातील ही दुसरी विद्यार्थी आत्महत्या आहे. उज्वल भविष्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादणाऱ्या पालकांमुळे आणि हे ओझे सहन न करू शकल्याने जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे कोटा ईशभरात चर्चेत आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या विद्यार्थीनेने आपल्या आई-वडिलांच्या नावे मन सुन्न करणारी एक सुसाईड नोट लिहिली आहे. यात तिने लिहिले आहे की, ती ही परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे तिच्यासमोर जीवन संपवणे हाच एकमात्र पर्याय होता. (Suicide in Kota)
कोटामधील ही या आठवड्यातील आणि नव्या वर्षातील दुसरी आत्महत्या आहे. आत्महत्या करणारी तरुणी निहारिका जीईई मेन्स परीक्षेची तयारी करत होती. तिने कोटामधील शिक्षानगरीतील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निहारिकाची परीक्षा ३१ जानेवारीला होती. निहारिकाने सुसाईड नोटमध्ये लिहिलेला मजकूर मन हेलावून टाकणारा आहे. तिने आपल्या पत्रामध्ये 'सर्वात वाईट मुलगी' आणि 'हाच शेवटचा पर्याय होता' असे शब्द वापरले आहेत. तिने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, मॉम-डॅड, मी जेईई करु शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. मी एक लूझर आहे. मी स्वत:च याला कारण आहे. मी खूप वाईट मुलगी आहे. सॉरी मॉम-डॅड. हाच शेवटचा पर्याय होता.
२३ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या आणखी एका विद्यार्थ्याने कोटामध्ये आत्महत्या केली. तो कोटातील एका खासगी कोचिंगमध्ये एनईईटीची (निट) तयारी करत होता. १७ वर्षाच्या मोहम्मद झैद हा हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कोटा हे जितके शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहे. इंजिनियरिंग, मेडिकल प्रवेश परीक्षांची तयार करण्यासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी कोटा येथे येत असतात. २०२३ मध्ये कोटात २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. जिवघेणी स्पर्धा आणि पालकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा यामुळे विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य बिघडते आणि ते टोकाचे पाऊल उचलतात.
मागच्या वर्षी २६ विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
‘नीट’ परीक्षांची तयारी करणाऱ्या २३ विद्यार्थ्यांनी २०२३ सालात आत्महत्या केल्यामुळे कोटा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. मागच्या वर्षी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी आपले जीवन उमलत्या वयातच संपवले. आपल्या घरापासून दूर राहून विविध स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कोटात वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञांची मात्र कमतरता आहे.
राजस्थानात अभ्यासासाठी अनुकूल वातावरण असल्याने देशभरातील पालक आपल्या पाल्यांना राजस्थानातील कोटा, सिकर, जयपूर आदी शहरांत पाठवतात. राजस्थान सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणेमुळे २०२३ च्या सप्टेंबरमध्ये कोटातील न्यू मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात आले. मात्र, या केंद्रात मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती केलेली नाही. या केंद्रासाठी पाच मानसोपचारतज्ज्ञांची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. राजस्थानातील वैद्यकीय महाविद्यालयांत मानसशास्त्रात एम.फिल करण्याची सोय नाही. त्यामुळे, ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. इतर राज्यांतील या विषयातील पदवीधारक राजस्थानात आहेत.
मात्र, त्यांची संख्या खूपच अपुरी आहे. कोटातील सरकारी रुग्णालयांत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांची उणीव असताना खासगी क्षेत्रातील चित्रही वेगळे नाही. कोटात अवघे तीन-चार खासगी मानसोपचारतज्ज्ञ असून त्यापैकी दोन मानसोपचारतज्ज्ञ शहरांतील प्रसिद्ध कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहेत.