कोलकाता: कोलकाता येथील आर. जी. कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणाच्या तपासाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सियालदाह न्यायालयाने तपास यंत्रणेला उदासीनतेवरून फटकारले आहे.
आरोपीच्या जामिनाबाबतच्या सुनावणीस सीबीआयचे वकील आणि तपास अधिकारी तब्बल ४० मिनिटे उशिराने हजर झाले. त्यामुळे न्यायालयाने सीबीआयची खरडपट्टी काढली.आरोपी संजय रॉय याच्या जामिनाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू होताच सीबीआयचे वकील आणि तपास अधिकारी तब्बल ४० मिनिटे उशिराने न्यायालयात
पोहोचले. तत्पूर्वी आरोपीच्या वकिलाने आरोपीला जामीन मिळावा, अशी मागणी केली गेली. या कामकाजाच्या वेळी तपास अधिकारी आणि त्यांचे वकील गैरहजर होते. तब्बल ४० मिनिटे उशिराने ते न्यायालयात पोहोचले. त्यामुळे न्यायालयाने दोघांनाही फटकारले. इतक्या महत्त्वाच्या खात्याचे कामकाज सुरू आहे. त्याबाबत तुमचा दृष्टिकोन अजिबात योग्य नाही. जर तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेऊ शकत नसाल आणि तुमची वृत्ती उदासीन राहिली तर आम्ही आरोपींना जामीन द्यावा का, असा सवाल करत न्यायालयाने तपास यंत्रणेची खरडपट्टी काढली.
सीबीआयने या प्रकरणात १० पॉलिग्राफ चाचण्या आणि १०० लोकांची चौकशी केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने पॉलिग्राफ चाचणीदरम्यान या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे म्हटले आहे आणि मृतदेह पाहून तो पळून गेल्याचा दावा केला, अशी माहिती समोर आली आहे. ज्यावेळी संजय रॉयला अटक झाली होती, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. मात्र, आता त्याने यू-टर्न घेतला आहे. आपण निर्दोष असल्याचा दावा आरोपी संजयने केला आहे. मात्र, सीबीआयने आरोपीविरुद्ध सर्व पुरावे सादर केले आहेत. मृताच्या शरीरातून पुरावा म्हणून गोळा केलेले नमुने संजय रॉय याच्या डीएनएशी जुळले होते, त्यामुळे संजय हाच गुन्हेगार असल्याचे सीबीआयचे मत आहे.
दरम्यान, कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशनने कोलकाता येथीwल आर. जी. कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. या मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने, मृत महिला डॉक्टरला आधी मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा दावा केला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळणार की काय, असा प्रश्न देखील विचारला जात आहे.