कीर्तीकरांच्या उमेदवारीने निरुपम संतापले!
#मुंबई
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीत लोकसभेच्या ८ ते ९ जागांवर अद्याप एकमत झालेले नाही. यातील एक जागा उत्तर-पश्चिम मुंबई ही देखील आहे. असे असताना परस्पर उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन असल्याची टीका निरुपम यांनी केली आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर सध्या निवडून आलेले आहेत. गजानन कीर्तीकर हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम लोकसभा जागेवरून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवसेना उमेदवार गजानन कीर्तीकर यांनी संजय निरुपम यांना २,६०,००० हून अधिक मतानी पराभूत केलं होतं.
देशभरात विविध राज्यांमध्ये इंडिया आघाडीत उभी फूट पडलेली असताना महाराष्ट्रातही इंडिया आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी खासदार गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर याला उमेदवारी जाहीर केली. या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे नेत संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. करोना काळात गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची घाई का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय निरुपम यांनी युती धर्माचे सल्ले देतानाच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या उमेदवारावरही अनेक आरोप केले आहेत. संजय निरुपम म्हणाले, काँग्रेसची अवहेलना करण्यासाठी जाणीवपूर्वक असे कृत्य केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला उमेदवार कोणता आहे तर तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज आहे. त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकद्वारे लाच घेतली आहे. कोविडच्या काळात स्थलांतरित मजुरांना महापालिकेकडून चांगला उपक्रम राबविला होता. मजुरांना मोफत जेवण दिले जात होते. गरिबांच्या मोफत जेवणातूनही शिवसेनेच्या उमेदवाराने कमिशन खाल्ले असून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करणार का, हा माझा दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला प्रश्न आहे.
संजय निरुपम ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणतात, शनिवारी शिल्लक शिवसेनेने उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केला. अद्याप जागावाटप झालेले नाही, तरी उबाठा गटाकडून अशी उमेदवारी कशी जाहीर केली जाऊ शकते, असा सवाल आता लोक विचारत आहेत. मविआच्या दोन डझन बैठका झाल्या असून अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. ज्या ८-९ जागांची चर्चा बाकी आहे, त्यात या मतदारसंघाचाही समावेश आहे, अशी माहिती माझ्या काँग्रेसमधील सहकाऱ्यांनी दिली. शिवसेनेकडून जर एकतर्फी उमेदवारी जाहीर होत असेल तर हा आघाडीच्या धर्माचे उल्लंघन आहे.