केजरीवाल नव्हे मिस्टर नटवरलाल!
#नवी दिल्ली
ज्या अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारावरून लालूप्रसाद यादव आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे त्यांनी आता या दोन्ही नेत्यांची गळाभेट घेत आपण राजकारणातले नटवरलाल असल्याचे स्पष्ट केले असल्याचे सांगत भाजपने आप आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीवर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी गुरुवारी जोरदार टीका केली आहे. केजरीवाल हे भारतीय राजकारणातले नटवरलाल आणि 'पिनाचिओ' हे कार्टून पात्र असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल यांनी गतकाळात लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात केलेले ट्विटही पूनावाला यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दाखवले. केजरीवाल यांनी आतापर्यंत अनेक वेळा वैचारिक यू-टर्न घेतलेला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी अण्णा हजारेंना पाठिंबा दिला होता. आता एकेकाळी ज्यांच्याविरोधात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यांच्याशीच हातमिळवणी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
केजरीवाल यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतली. लालू प्रसाद यादव यांचे नाव जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यात घेतले जात आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनी घेतल्या होत्या. हा आरोप संयुक्त जनता दलानेच केला होता. राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांची युती म्हणजे चुलत भ्रष्टाचारी भाऊ एकत्र आले आहेत. आता केजरीवाल लालू प्रसाद आणि त्यांच्या मुलाला कट्टर इमानदार असल्याचे प्रमाणपत्र देणार आहेत का ? हेच प्रमाणपत्र त्यांनी सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना दिले असल्याचा आरोपही पूनावालांनी केला आहे.
वृत्तसंस्था