पोलीस बंडाच्या भीतीमुळे काश्मीर केंद्रशासित केले
#नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक विधाने केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर केलेल्या आरोपांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. काश्मीरमधील ३७० वे कलम हटवल्यानंतर तेथे पोलीस बंडाची भीती केंद्र सरकारला वाटत होती, असे मलिक यांनी सांगितले आहे. तसेच आपण राज्यपाल असतानाही या निर्णयाची आपल्याला काहीही माहिती दिली नव्हती असाही खुलासा त्यांनी केला आहे.
मलिक काश्मीरचे राज्यपाल असताना ५ ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवले होते. याविषयी ते म्हणतात की, त्यावेळी आपल्याशी केंद्र सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कोणतीही चर्चा केली नव्हती. ही बाब मी शपथेवर सांगू शकतो. मला काहीच माहिती नव्हतं. ४ ऑगस्टला रात्री मला गृहमंत्र्यांचा फोन आला की सत्यपाल मी एक चिठ्ठी पाठवतोय. सकाळी ११ च्या आत तुमच्या समितीकडून मंजूर करून पाठवून द्या. माझ्या चिठ्ठीशिवाय कलम ३७० हटलेच नसते. पहिल्या दिवसापासूनच मला माहिती होते की हे होणार आहे. मोदींचा पहिला अजेंडा कलम ३७० हटवणं हाच होता.
कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरचे पोलीस बंड करतील अशी भीती केंद्राला होती असे सांगून मलिक म्हणतात की, काश्मीरमधील जनतेला ३७० कलम हटवण्यापेक्षा राज्य केंद्रशासित प्रदेश केले याचे जास्त वाईट वाटले. मोदी आपल्याच धुंदीत असतात. त्यांना काही माहिती नसते. काश्मीरच्या खऱ्या समस्येबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यांना तर हेही माहिती नव्हतं की हुर्रीयत कसं काम करते. मी दोन-तीन वेळा त्यांना सांगितलं की, काश्मीरचा मुद्दा सुटू शकतो, पण ते त्यासाठी इच्छुक नव्हते. मोदींबाबत सगळ्या जगाचं जे मत आहे ते माझं नाही. मी त्यांना जेव्हा केव्हा भेटलो, तेव्हा मला जाणवलं की त्यांना अजिबात काही माहिती नाही.
पुलवामा हल्ल्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि सीआरपीएफ व्यवस्थापन असे दोघे जबाबदार असल्याचं मलिक म्हणाले आहेत. “सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही, पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. यावर त्यांनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला.
वृत्तसंस्था