झारखंड उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका
#रांची
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. २०१८ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणात न्यायालयाने निर्णय देताना राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. राहुल गांधी यांनी दिवाणी न्यायालयाने जारी केलेल्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.
राहुल गांधी यांनी २०१८ साली बेंगळुरू येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयात सुरू असलेली कार्यवाही रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
१६ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांच्याकडून लिखीत बाजू न्यायालयात मांडण्यात आली होती. यानंतर न्यायमूर्ती अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता. यापूर्वी मोदी आडनावाबद्दल अक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती. त्याच आधारावर त्यांना लोकसभा सदस्यत्व देखील गमवावे लागले होते. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली आणि त्यानंतर राहुल गांधीची सदस्यता पुन्हा बहाल करण्यात आली होती.