विवाहित असूनही लग्नाचे वचन घेणे अनैतिक
#नवी दिल्ली
लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केल्याच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहित महिलेला एखाद्या पुरुषाने लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि शारीरिक संबंध ठेवल्यास, अशा पुरुष जोडीदारावर बलात्काराचा आरोप करता येणार नाही. स्वतः विवाहित असूनही पुरुषाकडून लग्नाचे वचन घेणे अनैतिक आहे. अशा परिस्थितीत लग्न होऊ शकत नसेल तर पुरुष जोडीदारावर बलात्काराचा खटला भरता येत नाही.
वास्तविक, एका महिलेचा तिच्या पतीविरुद्ध घटस्फोटाचा खटला सुरू आहे. या दरम्यान ती एका तरुणाच्या संपर्कात आली. त्याची तिच्याशी मैत्री झाली आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पण महिलेने सप्टेंबर २०२० मध्ये, तरुणाने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हणत, तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यावेळी केलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की, तरुणाने लग्नाचे आश्वासन दिल्यानंतरच तिने घटस्फोटासाठी केस दाखल केली होती, पण नंतर तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने हा बलात्कार असल्याचे तिने सांगितले.
महिलेच्या म्हणण्यानुसार, एका मंदिरात लग्न केल्यानंतर ती या तरुणासोबत पत्नीप्रमाणे राहू लागली. मात्र नंतर या तरुणाने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर तिने बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. न्यायमूर्ती सीटी रवी कुमार आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीनंतर सांगितले की, महिला तिच्या पुरुष जोडीदारापेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. ती मानसिकदृष्ट्या परिपक्व तर होतीच पण नात्यातील नैतिकता आणि अनैतिकतेची तिला पूर्ण जाणीव होती. अशा परिस्थितीत एखाद्याने तिच्या पुरुष जोडीदारावर बलात्काराचा आरोप करणे योग्य नाही.