इतर मागासांचा भाजपच करते अपमान
#कोलार
कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या काँग्रेसच्या पहिल्या सभेत ज्येष्ठे नेते आणि लोकसभा सदस्यत्व रद्द केलेल्या राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढविला. कोलार येथील जय भारत रॅलीत राहुल गांधी यांनी केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष इतर मागासांच्या विरोधात असल्याची टीका केली. २०१९ मध्ये कोलार येथे झालेल्या जाहीर सभेतील मोदी नावावरून केलेल्या टीकेबाबत त्यांच्यावर गुजरातच्या सुरत कोर्टात बदामीचा खटला दाखल केला होता. त्यामुळे संसद सदस्यत्व रद्द झाल्यावर त्यांनी आपली पहिली सभा कोलार येथेच घेतली.
मोदी सरकार देशातील इतर मागासांचा अपमान करत असल्याची टीका करून राहुल गांधी म्हणाले की, भाजप म्हणते मी इतर मागासांचा अपमान केला. आता इतर मागासांबाबत बोलू या. आमचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर असताना आम्ही जनगणना केली. त्या जनगणनेचा तपशील मोदी सरकारने दडवून ठेवला असून तो जाहीर करण्यास ते तयार नाहीत. जनगणनेचा तपशील जाहीर केला तर इतर मागासांचा अपमान मोदी सरकार कसा करत आहे ते स्पष्ट होईल.
संसदेत बोलण्यास आपणाला मोदी सरकारने परवानगी नाकारल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ त्यांचे मित्र उद्योजक गौतम अदानी आणि त्यांच्या उद्योग विस्तारासाठी काम करतात. जेव्हा जेव्हा मी अदानी यांच्याविरुद्ध संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा माझा माईक बंद केला गेला. अदानी यांच्या विमानात मोदी आणि अदानी दोघे एकत्र बसल्याचे छायाचित्रही दाखवण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेला. याबद्दल सभापतींना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी केवळ स्मितहास्य करून दुर्लक्ष केले. मोदी लवकरच हा देश अदानींना विकून टाकतील.
कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येण्याचा ठाम विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, सत्तेवर आल्यावर काँग्रेस पक्ष दिलेल्या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी करेल. राज्यात काँग्रेसची हवा असून त्याचे सर्व श्रेय हे राज्यातील पक्षनेत्यांना आहे. काँग्रेसच्या १३० पेक्षा अधिक जागा निवडून येणार आहेत. वृत्तसंस्था