लोक उपाशी मरत असताना उधळपट्टीला उधाण
#नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी लोकांना संबोधित करताना अंबानी कुटुंबाच्या प्री-वेडिंग सेरेमनीवरून टिपण्णी केली. राहुल गांधी म्हणाले की, अंबानींच्या कुटुंबात लग्न होतंय. तिथे लोक सेल्फी काढत आहेत आणि इथे लोक उपाशी मरत आहेत.
जगभरातले दिग्गज लोक अंबानींच्या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत. गुजरातच्या जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग सेरेमनी सुरू आहे.
ग्वाल्हेर येथे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, सध्या मी जे बोलतोय ते कुणीही दाखवणार नाही. टीव्हीवर फक्त अंबानी यांच्या मुलाचा शाही विवाह दाखवला जातोय. तिथे लग्नाची धुमधाम सुरू आहे. जगभरातील लोक येत आहेत.. सेल्फी घेतल्या जात आहेत.. आणि तुम्ही इथे उपाशी मरत आहात. राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सरकारला घेरले. राहुल म्हणाले की, भारत जोडो यात्रेनंतर आम्ही भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. या यात्रेमध्ये आम्ही न्याय हा शब्द जोडला आहे. त्याचे कारण देशामध्ये जो द्वेष पसरत चालला आहे त्याचे कारण अन्याय आहे. सध्या देशात ४० वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण केंद्र सरकार असून मोदींनी जीएसटी लावली आणि नोटबंदी केली. त्यामुळे देशातल्या लोकांचे रोजगार गेले आहेत.
ग्वाल्हेर येथे राहुल गांधींनी पुन्हा एकदा जातनिहाय जनगणनेची मागणी केली. ते म्हणाले की, देशात साधारण ५० टक्के ओबीसी, १५ टक्के दलित आणि ८ टक्के आदिवासी वर्गातील लोक आहेत. म्हणजे ७३ टक्के लोक. देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांमधील मॅनेजमेंटमध्ये एकही ओबीसी, दलित किंवा आदिवासी तुम्हाला दिसणार नाही. आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केली तर मोदी म्हणतात- देशात केवळ दोन जाती आहेत.. गरीब आणि श्रीमंत. देशातल्या ७३ टक्के लोकांना संधी मिळावी, असे त्यांना वाटतच नाही अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.