संग्रहित छायाचित्र
प्रवाशांची सोय आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेने 1 जानेवारी 2025 पासून रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, पश्चिम रेल्वेच्या (WR) 107 लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार या 107 गाड्यांमध्ये एकूण 1363 मिनिटांचा प्रवास वेळ वाचवण्यात आला आहे. यामध्ये 5 मिनिटांपासून 85 मिनिटांपर्यंतची प्रवासाची वेळ कमी करण्यात आली असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्य बदलांपैकी, बांद्रा टर्मिनस - वेरावळ एक्सप्रेसच्या प्रवास वेळेत 85 मिनिटांची कपात करण्यात आली आहे. इतर महत्त्वाच्या गाड्यांच्या प्रवासाच्या वेळा देखील कमी करण्यात आल्या आहे. साबरमती - वाराणसी एक्सप्रेस - 55 मिनिटांनी, बांद्रा टर्मिनस - बाडमेर एक्सप्रेस - 45 मिनिटांनी, आणि बांद्रा टर्मिनस - बिकानेर एक्सप्रेस -30 मिनिटांनी प्रवासाच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, अमृतसर - मुंबई सेंट्रल पश्चिम एक्सप्रेसच्या प्रवास वेळेत 25 मिनिटांची कपात करण्यात आली आहे, आणि बांद्रा टर्मिनस - भगत की कोठी एक्सप्रेसच्या प्रवासात आता 15 मिनिटे वाचणार आहेत.
तथापि, ऑपरेशनल कारणांमुळे 24 गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद - मुंबई सेंट्रल गुजरात सुपरफास्ट एक्सप्रेसच्या प्रवास वेळेत 4 मिनिटांची वाढ आहे. बांद्रा टर्मिनस - भुज एक्सप्रेस आणि बांद्रा टर्मिनस - लाल कुआं एक्सप्रेससह 11 गाड्यांच्या प्रवास वेळेत 5 मिनिटांची वाढ होईल. इतर गाड्यांच्या प्रवास वेळेत 10, 15, 20, 25 मिनिटांपर्यंत, तर काही गाड्यांमध्ये 55 मिनिटांपर्यंत वाढ होईल, ज्यामध्ये कानपूर - वलसाड एक्सप्रेस, प्रयागराज - अहमदाबाद एक्सप्रेस, आणि गोरखपूर - बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
आणखी एका महत्त्वाच्या निर्णयात, सहा एक्सप्रेस गाड्यांना सुपरफास्ट सेवांमध्ये उन्नती देण्यात आली आहे, ज्यामध्ये वलसाड - भगत की कोठी एक्सप्रेस, साबरमती - वाराणसी एक्सप्रेस, आणि बांद्रा टर्मिनस - बारमेर हमसफर एक्सप्रेस यांचा समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेच्या शेकडो गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळा 5 ते 20 मिनिटांनी बदलण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मध्य रेल्वेवर अनेक गाड्यांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत. 17 गाड्या आता इगतपुरी येथे व्यावसायिक थांबा घेतील. याशिवाय, 11 गाड्यांचे गंतव्यस्थान वाढवण्यात आले आहे, आणि अनेक एक्सप्रेस गाड्यांना सुपरफास्ट सेवांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवास वेळ आणखी कमी होईल.
या बदलांचा उद्देश प्रवाशांना जलद आणि अधिक विश्वासार्ह सेवा प्रदान करणे आहे. तसेच रेल्वे संपर्कासाठी वाढती मागणी पूर्ण करणे आहे. या बदलांद्वारे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे विभागांमध्ये कार्यक्षम ऑपरेशन्स राखून प्रवाशांच्या एकूण प्रवास अनुभवात सुधारणा होणार असल्याचे भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.