Bandipora Army Vehicle Accident....
Indian Army Vehicle Accident in Bandipora Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. लष्कराच्या जवानांनी भरलेले वाहन दरीत कोसळलं. या अपघातात 4 जवान शहीद झाले आहेत. तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या जवानांना तात्काळ रुग्णालयात भर्ती करण्यात आलं असून जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.
अपघात कधी आणि कुठे झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, " जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे हा अपघात झाला. आज म्हणजेच शनिवारी दुपारी वुलर व्ह्यू पॉईंटवरून लष्कराचे एक वाहन खाली पडले. गाडी खोल दरीत पडल्याने 4 जवानांना प्राण गमवावे लागले. तीन जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे."
बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या अपघातात 7 जण जखमी झाले असून, त्यापैकी 4 जवानांचा मृत्यू झाला असून 3 जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.
आठवडाभरापूर्वीही झाला होता अपघात
दरम्यान, असाच एक अपघात आठवडाभरापूर्वीही लष्कराचे वाहन दरीत कोसळल्यानं घडला होता. या अपघातात 5 जवान शहीद तर 5 सैनिक जखमी झाले होते. जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये हा अपघात झाला होता.
खराब हवामानामुळे वाढले अपघात....
मिडिया रिपोर्टनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे असे अपघात होत आहेत. कडाक्याच्या थंडीत खोऱ्यातील तापमान उणे असते आणि अनेक भागात दाट धुके असते. हवामान खात्याने जम्मू-काश्मीरमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार बर्फवृष्टीचा इशाराही जारी केला आहे.