धर्मांतराच्या संशयावरून आदिवासी महिलांना खांबाला बांधून मारहाण
बालासोर : ओडिशा येथील बालासोर या ठिकाणी दोन आदिवासी महिलांना धर्मांतराच्या संशयावरुन खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली. या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्यास झाले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी पितांबर बिस्वाल, प्रसंता कुमार नायक, जयंता कुमार नायक आणि बादल कुमार पांडा अशा चार जणांना अटक केली आहे. दोन महिला या बळजबरीने धर्मांतर करत आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला होता. बालासोरच्या रेमुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत छनखानपूर गावात ही घटना घडली होती. त्यानंतर या दोन महिलांना खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ही मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी महिलांची केली सुटका
आम्हाला जेव्हा ही घटना समजली तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जाऊन महिलांची सुटका केली. आम्ही आता यापुढची कारवाई करतो आहोत. अशी माहिती बालासोरचे डीआयजी सत्यजीत नाईक यांनी दिली आहे. या प्रकरणातल्या पीडित महिलांनी चार जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे आम्ही ती तक्रार दाखल करुन घेतली आहे. दरम्यान ज्या चारजणांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी बादल कुमार पांडाने या दोन महिलांच्या विरोधातही तक्रार केली आहे.
दोन महिलांवर गुन्हा दाखल
बादल कुमार पांडा यांच्या तक्रारीनंतर सदर दोन महिलांवर धार्मिक स्वातंत्र्य कायदा १९६७ च्या कलम ४ आणि कलम २९९ यांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१ च्या अनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात पोलिसांनी आणखी १० ते १५ जणांवरही गुन्हा दाखल केला आहे.
पांडा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की छनखानपूर या ठिकाणी असलेल्या गावातील लोकांना या महिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यास सांगत होत्या. गावातल्या रहिवाशांनी त्यांना असे करण्यापासून रोखले होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जबाब नोंदवून घेतल्या आहेत. पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.