लडाखच्या दुर्गम भागात भारतीय लष्कराचा सराव
#लडाख
भारत-चीन दरम्यानच्या लडाख सीमेवरील घटनांमुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण असून अजूनही त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. भारतीय लष्कराने लडाखमधील सिंधू नदीच्या काठावर अत्याधुनिक शस्त्रांसह आणि वाहनांसह सराव केला. लष्कराने न्योमा लष्करी तळावर नवीन लढाऊ वाहने तैनात केली आहेत. यामध्ये धनुष हॉवित्झर ते एम ४ जलद कृती दलातील वाहनांचा समावेश आहे.
लष्कराने सराव केलेला भाग हा सिंधू काठावर १४,५०० फूट उंचावरचा आहे. सरावाचा व्हीडीओ समोर आला असून त्यामध्ये टी-९० आणि टी-७२ रणगाडे नदी पार करताना दिसतात. भारताने बनवलेले स्वदेशी धनुष हॉवित्झर लष्करात दाखल झाले आहे. याबाबत कॅप्टन व्ही मिश्रा म्हणाले की, धनुष हॉवित्झर ४८ किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकतात. धनुष हॉवित्झर गेल्या वर्षीच पूर्व लडाखच्या सेक्टरमध्ये सामील करण्यात आले होते.
एम ४ या चिलखती वाहनावर सुरुंगांचाही परिणाम होत नाही. ते ५० किलोपर्यंतच्या आयईडी स्फोटाला तोंड देऊ शकते. सेक्टरमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लडाख सेक्टरच्या कठीण भागातही हे वाहन सुमारे ६०-८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते.
एम ४ वाहने गेल्या वर्षी लष्करात सामील होण्यास सुरुवात झाली. लष्कराने कोणत्याही भूभागावर चालतील अशी वाहने समाविष्ट केली आहेत. यात एकावेळी चार ते सहा सैनिक प्रवास करू शकतात. ही वाहने सैनिकांचे सामान आणि उपकरणे नेण्यासाठी वापरली जातात.
वृत्तसंस्था