भारतालाही बसणार मंदीची झळ
#नवी दिल्ली
जगभरातील विकसित अर्थव्यवस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्या एकापाठोपाठ एक नोकरकपात करत सुटल्या आहेत. अशावेळी भारतावरही त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. जगभरात आर्थिक मंदीची लक्षणे दिसत असल्याने भारतातील बड्या कंपन्यांनी आणि स्टार्टअप कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे.
सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू आहे. टेक कंपन्यांमध्ये या वर्षी जानेवारीमध्ये ८५ हजार लोकांना कामावरून काढण्यात आले आहे आणि फेब्रुवारीमध्ये ३६,४९१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले होते. मार्च महिन्यात आयटी आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी नोकरकपातीचा धडाका लावला आहे. थोडक्यात जगभरातील टेक कंपन्यांनी या वर्षात आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले आहे. भारतीय स्टार्टअप्स आर्थिक मंदीमुळे अधिक त्रस्त आहेत. या कारणास्तव ते कर्मचारी कपातीच्या मार्गाचा अवलंब करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, भारतातील किमान ८२ स्टार्टअप्स बंद झाले आहेत आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
'या' कंपन्यांनी दिला सर्व कर्मचाऱ्यांना नारळ
स्टार्टअप्सवर नजर टाकली तर, या वर्षात आतापर्यंत १६ स्टार्टअप्सनी त्यांच्या १०० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यापैकी तीन स्टार्टअप कंपन्या भारतातील आहेत. बेंगळुरू येथील वूई ट्रेड आणि डीयूएक्स एज्युकेशन, चेन्नई येथील फायपोला यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. भारतीय स्टार्टअप्समधील कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय स्टार्टअप्समध्येही, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक कर्मचारी कपात होत आहे. या क्षेत्रातील १९ स्टार्टअप्सने आतापर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, त्यापैकी फक्त चार युनिकॉर्नने सुमारे ८५०० लोकांना कामावरून कमी केले आहे.
बायजू, ओला, ओयो, मिशो, एमपीएल, लिव्हस्पेस, उडाण, इनोव्हाकर, वेदांतू सारख्या कंपन्या कर्मचारी कपातीत पुढे आहेत. होम इंटिरियर कंपनी लिव्हसपेसने अलीकडेच सुमारे १५० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. त्याचप्रमाणे 'दुकान'ने कपातीच्या दुसऱ्या फेरीत १०० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. हेल्थकेअर युनिकॉर्न प्रीस्टिन केअरने ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ग्लोबल डिलिव्हरी मॅनेजमेंट कंपनी फारआयने फेब्रुवारी महिन्यात १०० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. सोशल मीडिया कंपनी शेअरचॅटने आपल्या २० टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
वृत्तसंस्था