संग्रहित छायाचित्र
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय क्षेत्रात मोठे वादंग सुरू असल्याचे दिसत आहे. संसदेत केलेल्या त्यांच्या विधानचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत देखील पडल्याचे दिसत आहेत. शाह यांच्या विधानावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेतील या गोंधळानंतर कामकाज तहकूब करण्यात आले होते.
हे सगळे घडत असताना गृहमंत्री अमित शाह यांच्या बचावासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले आहेत. त्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट करत कॉंग्रेसवर ताशेरे ओढले आहे. अमित शाह यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला मोदींनी हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले आहे.
मोदी यांची 'एक्स' प्लॅटफॉर्मवरील पोस्ट
"जर काँग्रेस आणि त्यांची कुजलेली व्यवस्थेला असे वाटत असेल की अपप्रचार करून ते त्यांनी केलेले गैरप्रकार लपवू शकतात, विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार, तर ही त्यांची मोठी चूक ठरेल. भारतातील जनतेने वेळोवेळी पाहिले आहे की एकाच कुटुंबाच्या ताब्यात असणाऱ्या एका पक्षाने डॉ. आंबेडकर यांचा वारसा नष्ट करण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींना अपमानित करण्यासाठी शक्य त्या कुटिल खेळी केल्या आहेत," असे मोदी यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान कशा प्रकारे केला हे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी थेट एक यादीच दिली आहे. या यादीत मोदींनी म्हटले आहे की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकींमध्ये दोनदा पराभूत करणे, पं. नेहरूंनी त्यांच्याविरुद्ध प्रचार केला आणि त्यांचा पराभव हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला, डॉ. आंबेडकरांना भारतरत्न न देणे, संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आंबेडकरांच्या पोर्ट्रेट लावण्यास नकार देणे यांसारख्या गोष्टींमधून काँग्रेसने त्यांचा अवमान केला," असे मोदी यांनी सांगितले.
"काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी पण ते नाकारू शकत नाहीत की अनुसूचित जाती-जमातींविरोधातील सर्वात मोठे भीषण हत्याकांड त्यांच्याच शासनकालात झाले आहेत. वर्षानुवर्षे सत्तेत बसून अनुसूचित जाती आणि जमातींच्या सक्षमीकरणासाठी काँग्रेसने काहीही ठोस कार्य केले नाही," असे आपल्या पोस्टमध्ये मोदींनी लिहिले आहे.
"संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांचा अपमान करण्याचा आणि अनुसूचित जाती-जमातींची उपेक्षा करण्याचा काळा इतिहास उघड केला. त्यांनी मांडलेली तथ्ये ऐकून चांगलेच काँग्रेसला धक्का बसला आहे. म्हणूनच आता ते नाटकं करत आहेत. परंतु दुर्दैवाने, लोकांना सत्य माहीत आहे," असे मोदी यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.