संग्रहित छायाचित्र
सुप्रसिद्ध कलाकार, तबला वादक, संगीतकार, अभिनेते झाकीर हुसेन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्कोमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसेन हे अमेरिकेत वास्तव्य करत होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय आणि जागतिक संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. झाकीर हुसेन यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात भारतीय शास्त्रीय संगीतापासूनच केली होती. मात्र आपल्या अद्वितीय शैलीमुळे झाकीर हुसेन जागतिक स्तरावरचे प्रसिद्ध कलाकार झाले.
अल्प परिचय
९ मार्च १९५१ या दिवशी जन्मलेले झाकीर हुसेन यांचे वडील सुप्रसिद्ध तबला वादक अल्लारखा खान हे होते, तर त्यांच्या आईचे नाव बावी बेगम होते. वयाच्या सातव्या वर्षांपासून तबल्यावर त्यांची बोटे आणि हातांची थाप पडू लागली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून ते तबला वादनाचे कार्यक्रम करू लागले. वॉशिंग्टन येथील विद्यापीठात त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट ही पदवीही घेतली. त्यांचे दरवर्षी साधारण १५० कार्यक्रम होत असत.
पहिले मानधन ५ रुपये
वयाच्या १२ व्या वर्षांपासून ते वडिलांसह कार्यक्रमांमध्ये तबला वादन करत होते. जेव्हा ते १२ वर्षांचे होते त्यावेळी उस्ताद अल्लारखा खान, पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांना भेटले. झाकीर हुसेन यांनी १२ व्या वर्षी वडिलांसह तबला वादन केले तेव्हा त्यांना ५ रुपये मानधन मिळाले होते. हे पाच रुपये माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत, असे झाकीर हुसेन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
वाह उस्ताद नही वाह ताज बोलिए!
१९९० च्या दशकात टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या एका जाहिरातीमुळे झाकीर हुसेन यांचे नाव अनेकांना पहिल्यांदा माहिती झाले. ब्रूक बाँड ताजमहाल चहाच्या जाहिरातीमधील झाकीर हुसेन चांगलेच गाजले होते. संपूर्ण पिढीसाठी ही जाहिरात कधीही न विसरणारी आठवण आहे. ताज महालच्या बॅकड्रॉपमध्ये 'वाह उस्ताद नही, वाह ताज बोलिए' हे हुसेन यांचे शब्द आजही अनेकांच्या लक्षात आहेत. ब्रूक बाँड चहा १९९६ साली कोलकातामध्ये सुरू झाला. विशेष म्हणजे महान तबलावादक या जाहिरातीसाठी पहिली चॉईस नव्हते. अभिनेत्री झीनत अमान आणि मालविका तिवारी यांनी या जाहिरातीमध्ये काम केले होते. पण, चहाची लोकप्रियता मध्यमवर्गीयांमध्येही वाढत आहे, हे चहा निर्मात्यांच्या लक्षात आले. ताजमहाल चहाची नवी इमेज तयार करण्यासाठी हिंदुस्थान थॉमसन असोसिएट्सची मदत घेण्यात आली. कंपनीच्या नव्या ग्राहकांना अपील होईल अशा नव्या चेहऱ्याची त्यांना गरज होती. त्याचबरोबर त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृती यांचा मिलाफ साधणारा चेहरा हवा होता. एचटीएचे कॉपीराईटर केएस चक्रवर्ती हे तबला वादनाचे चाहते होते. त्यांना झाकीर हुसेन हे या जाहिरातीसाठी योग्य व्यक्ती असल्याचे लक्षात आले. याबाबत प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तानुसार झाकीर हुसेन यांना या जाहिरातीची कल्पना इतकी आवडली की ते स्वत:च्या खर्चाने शूटिंगसाठी सॅन फ्रँसिस्कोहून आग्रा येथे आले होते.
क्रांतिकारक कलावंत - मोदी
महान तबलावादक उस्ताद झाकीर हुसेनजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रतिभावान, क्रांतिकारक कलावंत म्हणून ते स्मरणात राहतील. त्यांनी तबलाही जागतिक स्तरावर आणला आणि लाखो लोकांना आपल्या अतुलनीय तालाने मंत्रमुग्ध केले. आपल्या कौशल्याने त्यांनी भारतीय शास्त्रीय परंपरांना जागतिक संगीताशी अखंडपणे जोडले, ते सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनले. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जागतिक संगीत समुदायाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
झाकीर हुसेन यांनी जगाला भारतीय संगीताची ‘शक्ती’ दाखवली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर एक खास पोस्ट लिहून उस्तादजींना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, जगप्रसिद्ध तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसेन यांचे दुःखद निधन झाले. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरू असते, मग तो श्वास असू दे की वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुले असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते आणि अशी माणसे अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसेन हे तबल्यातील ‘तालयोगी’ होते असे मला नेहमी वाटत राहिले. असे म्हणतात झाकीर हुसेन यांचे वडील अल्लारखा खान साहेबांनी, झाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले. असले जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येते मला माहीत नाही आणि जरी आले तरी ते पेलवावे झाकीरजींनीच. प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं आणि ते ऐकू येणे, त्याला वादकाने प्रतिसाद देणे ही क्रिया निरंतर सुरू असते. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांचा तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल.
महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबल्याच्या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील. वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरुवात करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबलावादनातील एकल मैफलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे.
ज्यांचा तबला ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि ज्यांच्यामुळे तबला वादन शिकायला लागलो ते जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन अवघ्या संगीत विश्वाला पोरके करून गेले. संपूर्ण विश्वात त्यांनी तबला वादनास सोलो वादन व साथ संगतीचे वाद्य म्हणून दर्जा मिळवून दिला. आपल्या बोटातील जादूने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्यामुळेच तबला वाद्य आज जगभरात लोकप्रिय वाद्य म्हणून ओळखले गेले. साथ संगत व सोलो वादन कसे असावे याचा आदर्श त्यांनी सर्व कलासाधकांना घालून दिला. आज त्यांच्या पुण्याईवर आमच्यासारखे अनेक कलाकार तबल्यावर उपजीविका करत आहेत, हे सर्व श्रेय त्यांना आहे. अवघ्या संगीतविश्वात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. झाकीरजी जोपर्यंत हे चंद्र ,सूर्य ,तारे, पृथ्वी आहे तोपर्यंत युगानुयुगे आपले नाव आणि तबला अजरामर राहील. - अविनाश पाटील, तबला वादक, पुणे
एवढा उत्तुंग तरीही पाय जमिनीवर असणारा कलाकार मी पाहिलेला नाही. त्यांच्या जाण्याने कलाविश्वाची प्रचंड हानी झाली आहे. झाकीरजींबद्दल सांगायचे झाल्यास वेळ पाळणे, कलेबद्दलचे प्रेम, समर्पणाची भावना, विनम्रता या गोष्टी त्यांच्या लेखी खूप महत्त्वाच्या होत्या. प्रारंभी तर झाकीरजी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतःच तबला घेऊन येत असत. विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. माझा विद्यार्थी पार्थ कुलकर्णी त्यांना अमेरिकेत भेटला. त्याची विचारपूस करताना त्याने आपण चार परीक्षा पास झाल्याचे सांगितल्यावर झाकीरजी त्याला म्हणाले, अरे बापरे मी तर एकही परीक्षा दिलेली नाही! अशी मिश्किली त्यांच्या स्वभावात होती. गणेश कला क्रीडामंच येथील कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी आणि झाकीरजी अशा दोन खुर्च्या होत्या. पंडितजी आले त्यावेळी त्यांनी चटकन त्यांना खुर्ची दिली आणि स्वतः त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. अशा प्रकारे आपली विनम्रता सूचित केली. जगभरात देदीप्यमान कीर्ती मिळवलेल्या मोजक्याच महान कलाकारांच्या अंगी अशी ऋजुता दिसून येते. - विजय दास्ताने, प्रसिद्ध तबला वादक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.