संसदेच्या पायऱ्यांवरून पडून भाजपा खासदाराला दुखापत
राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपा खासदार प्रताप सिंग सारंगी यांनी केला. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना व्हीलचेअरवर बसवून उपचारासाठी नेण्यात आले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी अधिवेशनाचा १९ वा दिवस आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून लोकसभा आणि राज्यसभेतही गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर निषेध नोंदवला. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी हे आज निळे कपडे घालून संसदेत पोहोचले होते.
दरम्यान, संसदेबाहेर सुरू असलेल्या घोषणाबाजी दरम्यान भाजप खासदार प्रताप सिंग सारंगी संसदेच्या पायऱ्यांवरून पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केली म्हणून ते पडले असा आरोप सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी काही खासदारांना धक्काबुक्की केली. ते खासदार त्यांच्या अंगावर पडले. म्हणून त्यांना दुखापत झाली असे ते म्हणाले.
दुसरीकडे राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना असे काही घडले नसल्याचे सांगितले. सर्व घटना माध्यमांच्या कॅमेऱ्यात असेल. हे संसदेचे प्रवेशद्वार आहे. तिथून ते आत जात होते. भाजपा खासदार धक्काबुक्की करत होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना धमक्या देत होते. संसदेत जाणे हा त्यांचा अधिकार आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप खासदारांनी राहुल आणि प्रियांका यांना धक्काबुकी केली असल्याचा आरोप केला.
दरम्यान, राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.