९८ व्या साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केली संमेलनस्थळाची पाहणी
दिल्ली : अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सरहद पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे भरणार आहे. संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली.
या पाहणीसाठी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ . शैलेश पगारिया, अतुल बोकरीया, प्रदीप पाटील,लेशपाल जवळगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार यांनी संमेलनस्थळावर उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तलकटोरा स्टेडियममध्ये किती लोक येऊ शकतात, त्यांची बसण्याची, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी होईल याची पाहणी त्यांनी केली. पुस्तक प्रदर्शन स्थळ, कवीकट्टा आदींची स्थळ पाहणी त्यांनी केली तसेच संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या
साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद या संमेलनासाठी अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह देशभरातील नामवंत साहित्यिक, कवी, लेखक या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहतील, तसेच साहित्यप्रेमीही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्या अनुषंगाने सुव्यवस्थित नियोजन आणि सुरक्षेच्या बाबतीत काटेकोर उपाययोजना कराव्यात असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
संमेलनाच्या तीन दिवसांत साहित्यिक परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखत असे विविध कार्यक्रम होणार आहेत. पुस्तक विक्रीसाठीही भव्य दालन इथं असणार आहे. या तयारीचीही माहिती पवार यांनी यावेळी घेतली.
'महाराष्ट्र ही सलोख्याची आणि समन्वयाची भूमी आहे. ही ओळख निर्माण होण्यात मराठी वाङ्मयाचा मोठा वाटा आहे. भारताचे वैचारिक प्रतिनिधित्व करण्यात महाराष्ट्राचा आणि मराठी साहित्याचा मोठा वाटा राहिला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या माणसांनी तर साहित्यात आणि देशाच्या जडणघडणीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. देशाच्या राजधानीत संमेलन होत असताना महाराष्ट्राच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करून मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठावर कसे नेता येईल', यादृष्टीने प्रयत्न या संमेलनाच्या अनुषंगाने करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
संमेलनाचे सुसज्ज आयोजन व व्यवस्थापनासाठी सुसज्ज टीम, तांत्रिक सुविधा आणि उपस्थित साहित्य रसिकांच्या दृष्टीने हे संमेलन स्मरणीय कसे होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून हे संमेलन मराठी साहित्याचा अनोखा सोहळा ठरणार असून त्यातून मराठी साहित्य आणि सांस्कृतिक बंध विस्तारेल, असं संजय नहार यांनी यावेळी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.