भारत एक राष्ट्र नव्हे तर उपखंड

‘भारतमाते’बाबत द्रमुक नेते ए. राजा यांचे वादग्रस्त वक्तव्य, आम्ही रामाचे शत्रू, ‘जय श्रीराम’ हा नारा घृणास्पद असल्याचेही केले विधान

PuneMirror

भारत एक राष्ट्र नव्हे तर उपखंड

#नवी दिल्ली

द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राजा यांनी भारत आणि सनातन धर्माबाबत संतापजनक वक्तव्य केले आहे. ए. राजा म्हणाले, भारत हे एक राष्ट्र नाही, ही गोष्ट सर्वांनी नीट समजून घ्या. भारत कधीच एक राष्ट्र नव्हते. भारत एक राष्ट्र नव्हे तर हा एक उपखंड आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना फटकारले होते. सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना खडे बोल सुनावल्यानंतर ए. राजा यांनी हे वक्तव्य केले आहे.

ए. राजा म्हणाले, “तुम्ही (सनातनवादी, हिंदुत्ववादी) म्हणत असाल की, अमूक एक तुमचा देव आहे आणि तुम्ही इतरांना ‘भारत माता की जय’ बोलायला सांगत असाल तर आम्ही तुमचा ईश्वर मानत नाही. तसेच तुमच्या भारतमातेचा आम्ही स्वीकार करत नाही. त्यांना सांगा आम्ही सर्वजण रामाचे शत्रू आहोत. माझा रामायणावर आणि रामावर विश्वास नाही, असे सांगत राजा यांनी यावेळी हनुमानाची वानराशी तुलना केली. तसेच ‘जय श्रीराम’ हा नारा घृणास्पद असल्याचे  वक्तव्य केले. भारत कधीच एक राष्ट्र नव्हते. एका राष्ट्राचा अर्थ होतो, एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तेव्हा ते एक राष्ट्र असते.  परंतु, भारत एक राष्ट्र नाही. भारत एक उपखंड आहे. भारत हा एक उपखंड असल्याचे वाक्य रेटताना ए. राजा म्हणाले, इथे तमिळ हे एक राष्ट्र म्हणजेच एक देश आहे. मल्याळम एक भाषा, एक राष्ट्र, एक देश आहे. उडिया एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. अशी सगळी राष्ट्र मिळून भारत हा मोठा उपखंड तयार होतो. त्यामुळे भारत हा देश नसून एक उपखंड आहे.

या उपखंडात वेगवेगळ्या भाषा, परंपरा आणि संस्कृती आहेत. तुम्ही तमिळनाडूला आलात तर तिथली वेगळी संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल. केरळमधील संस्कृती वेगळी आहे. दिल्लीत वेगळी संस्कृती आहे. ओडिशात वेगळी संस्कृती आहे. काश्मीरमध्ये एक वेगळी संस्कृती आहे, तुम्ही त्या संस्कृतींचा स्वीकार करा. मणिपूरमधील लोक श्वानाचे (कुत्रा) मांस खातात. तुम्ही ती गोष्टदेखील स्वीकारली पाहिजे. एखादा समाज गोमांस खात असेल तर त्यात तुम्हाला काही अडचण असण्याचे कारण नाही. त्या लोकांनी तुम्हाला गोमांस खायला सांगितले आहे का? त्यामुळेच विविधतेत एकता असूनही आपल्यामध्ये मतभेद आहेत. परंतु, तुम्ही ते मतभेद स्वीकारले पाहिजेत.

दरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी केली होती. तसेच त्यांनी सनातन धर्माविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यावरून सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आहे आणि आता तुम्ही या प्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मागताय? तुम्ही सामान्य व्यक्ती नसून एक राजकारणी आहात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest