भारताने घडविला नवा इतिहास, चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी लँडिंग !
भारताचे चांद्रयान 3 लँडरने चंद्राला अलिंगन दिले आहे. इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत गेलं आणि बंगळुरुमधील इस्त्रोच्या मुख्यालयात एकच जल्लोष सुरू झाला. भारताचे चांद्रयान ३ लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि अवघ्या देशाचं लक्ष इस्त्रोच्या ज्या कमांड सेंटरकडे लागलं होतं त्या ठिकाणी एकच जल्लोष झाला.
भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली. श्वास रोखले गेले.हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले. आणि बातमी आली. चांद्रयान- ३ मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले.
भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय. त्यामुळे हा क्षण फक्त भारताच्याच नाही तर, अखंड जगाच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे.
भारताच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा पाहण्यास मिळतो आहे. कारण भारताचं चांद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरलं आहे. भारताचा झेंडा आता तिथे पाहण्यास मिळतो आहे. इस्रोला मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.