भारत बनला अव्वल
#नवी दिल्ली
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून तोरा मिरवणाऱ्या चीनचा भारताने रेकॉर्ड मोडला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फ्रंटच्या 'स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन'च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा किंचितशी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, येत्या काळात लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनपेक्षाही अधिक पुढे जाईल, अशी शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फ्रंटच्या 'स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन'च्या अहवालानुसार संपूर्ण लोकसंख्या ८ अब्जापेक्षा अधिक झाली आहे. यामध्ये भारत आणि चीनचा सर्वाधिक वाटा आहे. भारत-चीनमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा एक तृतीयांश लोक आहेत. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली असून चीनची १४२.५७ कोटी नोंदवण्यात आली आहे.
अहवालानुसार, भारताचा प्रजनन दर सरासरी २.० नोंदवण्यात आला आहे. तर, सरासरी आर्युमान पुरुषांसाठी ७१ वय तर महिलांसाठी ७४ वय आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार भारतीयांचे सरासरी आर्युमान ६९ वर्षे होते. आता ते वाढून ७१ वर्षांवर आले आहे. या अहवालात २०२२ मध्ये भारताची लोकसंख्या १४०.६ कोटी नोंदवण्यात आली होती. यापैकी ६८ टक्के १५ ते ६४ वर्ष वयोगटातील लोकांचा समावेश होता. तर, नव्या अहवालानुसार, २० कोटींहून अधिक लोकसंख्या १५ ते २४ वर्ष या वयोगटातील आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या वर्षीपेक्षा यंदा १.५६ टक्क्यांनी भारताची लोकसंख्या वाढली आहे.
भारत वेगाने शैक्षणिक, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान यात प्रगती करत आहे. या देशात २० कोटींहून अधिक जनता १५ ते २४ या वयोगटातील असल्याने या क्षमतेचा भारताला फायदाच होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करत असलेला चीन देश लोकसंख्येच्या बाबतीत जगभरात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, गेल्यावर्षी चीनची लोकसंख्या गेल्या सहा दशकांत पहिल्यांदा घसरली. तर, यंदाही या आकडेवारीत घसरण झालेली आहे. २०२२ मध्ये चीनची लोकसंख्या १४४.८५ कोटी नोंदवण्यात आली होती. तर, नव्या अहवालानुसार चीनमध्ये १४२.५७ लोकसंख्या असण्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तसंस्था