पंजाबमध्ये आप, काँग्रेसचा लोकसभेसाठी सवतासुभा!

पंजाबमध्ये स्वतंत्र लढणार, दिल्लीत मात्र जागावाटपावर चर्चा सुरू असल्याची केजरीवाल यांची माहिती

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Mon, 19 Feb 2024
  • 03:04 pm
Punjab,AAP,CongressarereadyfortheLokSabha!

पंजाबमध्ये आप, काँग्रेसचा लोकसभेसाठी सवतासुभा!

#नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता असून विरोधकांच्या इंडिया आघाडीत त्यासाठी जागावाटपावर चर्चा चालू आहे. त्यातच विरोधी पक्षांना त्यातल्या त्यात काँग्रेसला धक्क्यांमागून धक्के मिळत आहेत. अशातच पंजाबमध्ये आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसचे जागावाटपावर एकमत झालेले नाही. जागावाटपावर आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यावर काँग्रेस आणि आपमध्ये एकमत झाल्याचे सांगितले. 

केजरीवाल काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्या घरी जाऊन भोजन केले. त्यानंतर केजरीवाल यांनी माध्यमाशी संवाद साधला. काँग्रेस आणि आपने पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले असून यावर आमचे एकमत झाले आहे. याबाबतीत आमच्यात कोणतेही वैमनस्य नाही, असे केजरीवाल म्हणाले.

काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीतील महत्त्वाचे पक्ष आहेत. पंजाब राज्यात ते एकमेकांचे विरोधक आहेत. पंजाब राज्यात हे दोन्ही पक्ष स्वंतत्रपणे निवडणूक लढवणार असून दिल्लीसाठी आमच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. केजरीवाल म्हणाले की, दिल्लीमध्ये युती करण्यासाठी आमची काँग्रेस पक्षाशी चर्चा चालू आहे. दिल्लीमध्ये आमच्यात युती झाली नाही तर त्याचा भाजपाला फायदा होईल. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला होता. २०१४ मध्येही त्यांनी सर्व जागा जिंकल्या होत्या.

याआधी पंजाबचे मुख्यमंत्री तथा आपचे नेते भगवंत मान यांनीदेखील आपने पंजाबमधील सर्व १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे, असे सांगितले होते. या विधानानंतर काँग्रेसचे पंजाबमधील नेते प्रतापसिंग बाजवा यांनी भगवंत मान यांचे आभार मानत आम्हालादेखील हेच हवे आहे, असे सांगितले होते.

स्वतंत्र लढण्यात फायदा

“पंजाब आणि अन्य राज्यांत फरक आहे. पंजाबमध्ये आप सत्ताधारी पक्ष आहे, तर आम्ही तेथे प्रमुख विरोधी पक्ष आहोत. आम्ही पंजाबमध्ये एकत्र कसे निवडणूक लढवू शकतो. आम्ही दोघांनीही एकत्र निवडणूक लढवण्याचे ठरवल्यास सत्ताविरोधी भावना असलेले मतदार भाजपाला किंवा अकाली दलाला मतदान करतील. अशा पद्धतीने काँग्रेस पक्ष पंजाबमधून हद्दपार होईल. आम्हाला आमची व्होटबँक सांभाळायची आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे हेच काँग्रेस आणि आपसाठी सोईचे ठरणार असल्याचे बाजवा म्हणाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest