हरयाणामध्ये रेंजर भरतीवेळी महिलांच्या छातीचे माप मोजणार
#चंदीगड
हरयाणात वन विभागातील रेंजर आणि इतर पदांच्या भरतीसाठी महिलांच्या शारीरिक चाचणी (पीएमटी) मध्ये छाती मोजण्याची अटही घालण्यात आली आहे. यावरून आता वाद सुरू झाला आहे. या प्रश्नी विरोधी काँग्रेस पक्षाने सरकारला घेरले असतानाच सोशल मीडियावरही सरकारवर जोरदार टीका होत आहे. राज्य सरकारकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला याचा निषेध करताना म्हणतात की, हरयाणात फॉरेस्ट रेंजर आणि डेप्युटी रेंजर पदासाठी मुलींच्या 'छातीचे' माप घेणे हा निर्लज्ज, अपमानजनक, असंवेदनशील आणि संस्कृतीहीन निर्णय आहे. राज्यातील खट्टर-दुष्यंत सरकारच्या माहितीसाठी सांगतो की, त्यांच्या ७ जुलै २०२३ च्या आदेशाची प्रत, तसेच हरयाणा पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलातही अशी कोणतीही अट नसल्याचा पुरावा आहे. आता हे तुघलकी फर्मान परत घ्या आणि मुलींची माफी मागा.
हरयाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनने शुक्रवारी विविध पदांसाठी महिला आणि पुरुषांच्या शारीरिक माप चाचणीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
फॉरेस्ट रेंजर, डेप्युटी रेंजर आणि फॉरेस्टर या पदांसाठी भरतीमध्ये पुरुषांसाठी छातीच्या मापाची अट आहे. यासोबतच महिलांसाठी छातीबाबतचे नियमही निश्चित केले आहेत. महिलांच्या छातीचे माप सामान्य स्थितीत ७४ सेमी आणि विस्तार करून ७९ सेमी असावे, असे त्यात नमूद
केले आहे.वृत्तसंस्था