संग्रहित छायाचित्र
जयपूर: सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. अनेकदा या रिल्स आणि फोटोंच्या नादात लोक जीव धोक्यात घालतात, तर कधी कधी रिल शूट करण्याच्या नादात काहींनी जीव गमावल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील एका घटनेने खळबळ उडाली आहे. फोटो काढण्यासाठी एका दाम्पत्याने केलेली करामत त्यांच्याच जिवावर बेतली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एका दाम्पत्याने जीव धोक्यात घातला आहे.
रेल्वे पुलावर फोटोशूट करत असलेले पती-पत्नी ट्रेन येताना पाहून घाबरले. बचावासाठी दोघांनीही सुमारे ९० फूट खोल पुलावरून उडी मारली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. पतीला जोधपूरला रेफर करण्यात आले, तर जखमी पत्नीवर बांगड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी (१३ जुलै) दुपारी दोन वाजता पाली येथील गोरामघाट येथे हा अपघात झाला. वास्तविक, बांगडनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगडनगर येथे राहणारा राहुल मेवाडा (२२ वर्षे) हा शनिवारी पत्नी जान्हवीसोबत (२० वर्षे) दुचाकीवरून गोरामघाट येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी जान्हवीची बहीण आणि भावजयही तिच्यासोबत होते.
राजस्थानमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. त्यानंतर पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी पाली जिल्ह्यातील गोरामघाट पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. गोरामघाटावर पोहोचल्यावर मीटरगेज ट्रेनसाठी बांधलेल्या हेरिटेज पुलावर दोघेही फोटोशूट करत होते. दरम्यान, अचानक एक ट्रेन पुलाजवळ आली, ज्यामुळे राहुल आणि जान्हवी घाबरले. त्यांना ट्रेनची धडक बसेल असे वाटले. या भीतीपोटी दोघांनीही पुलावरून सुमारे ९० फूट खोल खड्ड्यात उडी मारली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना पहिल्यांदा फुलद रेल्वे स्थानकावर त्याच ट्रेनने आणण्यात आले. तेथून त्यांना रुग्णवाहिकेने मारवाड जंक्शन आणि नंतर सोजत सिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.
राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला सोजत येथून जोधपूरला हलवण्यात आले. त्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. जान्हवीच्या एका पायात फ्रॅक्चर आहे. त्यांना उपचारासाठी पाली येथील बांगड रुग्णालयात आणण्यात आले. जखमी जान्हवीसोबत तिची बहीण आणि भावजयही होते. अपघाताच्या वेळी तेही पुलावर उभे होते आणि जान्हवी-राहुलचे फोटो क्लिक करत होता. इतक्यात ट्रेन आली. अशा स्थितीत त्यांनी पुलावरून पळ काढला.
लोको पायलटने ट्रेनचे ब्रेक लावले
अजमेर रेल्वे विभागाचे वरिष्ठ व्यावसायिक विभाग व्यवस्थापक सुनील कुमार महाला म्हणाले की, पुलावर तरुण आणि तरुणीला पाहून लोको पायलटने ट्रेनला ब्रेक लावले होते. पुलावर ट्रेन थांबली, पण ट्रेन जवळ येत असल्याचे पाहून दोघेही घाबरले आणि पुलावरून खाली उडी मारली. रेल्वे पुलावरून चालणे चुकीचे आहे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.