िहंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे पडले महागात !
#आगरतळा
प्राणिसंग्रहालयातील सिंह आणि सिंहिणीचे अनुक्रमे 'अकबर' आणि 'सीता' असे नामकरण करण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्रिपुरा सरकारने राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन) प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित केले. ही नावे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने
कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अग्रवाल यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंह आणि सिंहिणीला प्राण्यांच्या देवाणघेवाण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १२ फेब्रुवारी रोजी त्रिपुराच्या सिपाहिजाला प्राणिसंग्रहालयातून सिलीगुडी येथील उत्तर बंगाल वन्य प्राणी उद्यानात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, नावांवरून वाद सुरू झाला. प्रवीण लाल अग्रवाल, १९४ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. ते त्रिपुराचे मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणून कार्यरत होते. सिलीगुडीला पाठवताना त्यांनी अकबर आणि सीता या सिंह जोडप्यांची नावे डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंदवली. मात्र यावरून वाद निर्माण झाला. यानंतर २१ फेब्रुवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी सर्किट बेंचमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने एक जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सिंह जोडीची नावे बदलण्याचे आदेश दिले. बंगाल वनविभागाने स्पष्ट केले की, ही नावे त्रिपुराने दिली आहेत आणि कोणत्याही बदलाची जबाबदारी त्रिपुरा प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांची आहे. नंतर विश्व हिंदू परिषदेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि दावा केला की ही नावे निंदनीय आहेत. न्यायालयानेदेखील नामकरणावर नाराजी व्यक्त केली. विश्व हिंदू परिषदेची बाजू मांडणारे वकील शुभंकर दत्ता म्हणाले की, हे प्रकरण लवकरच हायकोर्टाच्या नियमित खंडपीठासमोर येईल. प्रत्युत्तरात, त्रिपुरा सरकारने अग्रवाल यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले, ज्यांनी सिंहांच्या जोडप्याची नावे बदलण्यास नकार दिला आहे. ही नावे त्रिपुरा वन्यजीव अधिकाऱ्यांनी प्राण्यांच्या देवाणघेवाणी कार्यक्रमादरम्यान दिली होती, त्यामुळे अग्रवाल यांचे निलंबन करण्यात आले, असे तपासात उघड झाले.