प्राण्यांपेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा
#तिरूवनंतपूरम
भटक्या श्वानांप्रकरणी एक याचिका केरळ उच्च न्यायालयात करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी घेत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. काही लोकांनी भटक्या श्वानांना मारण्याची मागणी केली, तर काही जण भटक्या श्वानांच्या संरक्षणासाठी लढत आहेत. याप्रकरणी न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीक्रिष्णन यांनी खऱ्या श्वान प्रेमींना सल्ला दिला आहे. वृतपत्रात लेख किंवा माध्यमांमध्ये बाईट देण्यापेक्षा खऱ्या श्वान प्रेमींनी पुढे येऊन श्वानांच्या संरक्षणासाठी स्थानिक प्रशासनाची मदत करायला हवी, असे न्यायमूर्ती म्हणाले आहेत. श्वानप्रेमींनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. प्राणी जन्म नियंत्रण आणि केरळ महामालिका कायद्यानुसार श्वानांची काळजी घेण्यासाठी परवाना घ्यावा, असे न्यायमूर्ती म्हणाले.
माझे असे मत आहे की, श्वानप्रेमींनी वृत्तपत्र किंवा इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा पुढे येऊन श्वानांच्या संरक्षणासाठी स्थानिक सरकारी संस्थासोबत सहकार्य करावे. त्यांनी प्रशासनाकडून परवाना मिळवावा आणि श्वानांचे संरक्षण करावे. भटके श्वान आपल्या समाजाला धोका निर्माण करत आहेत. शाळेतील विद्यार्थी एकटे शाळेत जाण्यास घाबरत आहेत. त्यांना श्वानाच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. श्वानांच्या विरोधात काही कारवाई केल्यास श्वान प्रेमी येऊन त्याला विरोध करत असतात. मला वाटते की, माणसांना एका श्वानापेक्षा अधिक महत्त्व द्यायला हवे, पण, भटक्या श्वानांवरील व्यक्तींचे क्रूर हल्ले देखील रोखायला हवेत.
काय आहे नेमके प्रकरण?
कन्नूर जिल्ह्यातील मुळाथाडम वार्डमधील प्राणी प्रेमी राजीव क्रिष्णनन यांना कंटाळून स्थानिक रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुळाथाडम वार्ड हा लोकांनी गजबजलेला भाग आहे. याठिकाणी राजीव राहतात. एखाद्या श्वानावर हल्ला झाला, तो आजारी पडला तेव्हा राजीव त्यांना आपल्या घरी आणायचे आणि त्यांची काळजी घ्यायचे. अशा प्रकारे त्यांनी अनेक श्वानांना घरी आणले होते. स्थानिकांनी याचिकेमध्ये दावा केला की, राजीव यांनी मोठ्या संख्येने श्वास घरी आणलेत. त्यामुळे त्याठिकाणी मोठी घाण निर्माण होत आहे. राजीव सर्व श्वानांची काळजी घेण्यास असमर्थ आहेत. सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे स्थानिकांना याचा त्रास होत आहे. श्वास रात्री-बेरात्री भूंकत असतात त्यामुळे ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. राजीव यांना श्वान घरी ठेवण्यापासून रोखण्यात यावे यासाठी स्थानिकांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यावर म्हटले आहे की, स्थानिक प्रशासनावर श्वानांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्ती परवान्याशिवाय श्वानांना आपल्या घरी ठेवू शकत नाही. राजीव यांच्याकडे परवाना नसल्याने आधी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून परवाना मिळवावा. राज्यात श्वानांचे हल्ले वाढले आहेत. दुसरीकडे, राजीव यांचे प्राणीप्रेम देखील कौतुक करण्यासारखे आहे.पण, त्यांनी नियमांनुसार परवाना घेणे आवश्यक आहे. श्वानांसाठी आवश्यक जागेत ठेवणे आणि परिसरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित कायद्याला अनुसुरुन त्यांनी श्वानांची काळजी घ्यायला हवी.